Join us

निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 05:59 IST

महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील, अशी आशा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठी आणि महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना काँग्रेसच्या महिला खासदारांनी जाब विचारल्याबद्दल मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र पाठवून खासदारांचे आभार मानले आहेत. तसेच ‘महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस यासमोर आपले वैचारिक मतभेद अत्यंत शुद्र आहेत’, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. 

मराठी माणसांना आपटून आपटून मारू, अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातला आणि त्याला जाब विचारलात, याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन! महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान होत असताना, संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात, असे चित्र मराठी जनांच्या समोर येत होते. त्याला तुम्ही या कृतीने छेद दिला. याबद्दल खरंच मनापासून आभार, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का बसले, माहिती नाही. पण, तुम्ही हिंमत दाखवलीत, महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील, अशी आशा राज यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :राज ठाकरेमनसेभाजपाकाँग्रेस