२०१९ मध्ये बॉल स्विंग होणार नाय; राज ठाकरेंनी 'रिव्हर्स स्विंग'ने उडवली मोदी-शहांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 18:35 IST2018-03-31T18:11:57+5:302018-03-31T18:35:04+5:30
राज यांनी मोदी-शहांमधील 'दिल्लीच्या ड्रेसिंग रूममधील चर्चे'ची खिल्ली उडवली आहे.

२०१९ मध्ये बॉल स्विंग होणार नाय; राज ठाकरेंनी 'रिव्हर्स स्विंग'ने उडवली मोदी-शहांची दांडी
मुंबईः मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात 'मोदीमुक्त भारता'ची साद घालणारे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जोडीला आपल्या कुंचल्याने 'फटकार'लं आहे. ऑस्ट्रेलियन त्रिकुटाने चेंडूशी छेडछाड केल्याचं प्रकरण गाजत असताना, त्याचाच संदर्भ घेऊन राज यांनी मोदी-शहांमधील 'दिल्लीच्या ड्रेसिंग रूममधील चर्चे'ची खिल्ली उडवली आहे.
गेल्या काही काळापासून राज ठाकरे सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य करत आहेत. आपल्या फेसबुक पेजवरील निम्म्याहून जास्त व्यंगचित्रांतून त्यांनी मोदी-शहांचा समाचार घेतलाय. तीच मालिका कायम ठेवत आज त्यांनी खास 'ठाकरी' रिव्हर्स स्विंग टाकलाय.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. मोदीमुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं सूचक आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यामुळे येत्या काळात मोदी-शहा हेच राज ठाकरेंचं टार्गेट असणार, हे नक्की आहे.