Raj Thackeray Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंना थेट इशारा, "चुकीचा इतिहास माथी मारून राज्य पेटवणार असाल तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 18:09 IST2022-05-02T18:08:13+5:302022-05-02T18:09:00+5:30
राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार याबद्दल बोललं पाहिजे- आव्हाड

Raj Thackeray Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंना थेट इशारा, "चुकीचा इतिहास माथी मारून राज्य पेटवणार असाल तर..."
Raj Thackeray Jitendra Awhad: राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल बोलले पाहिजे. पण काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास सांगून आणि तो तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न होणार असेल तर आम्ही कधीही ते यशस्वी होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले आणि अभ्यासपूर्ण संदर्भ देऊन प्रतिवाद केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबतचा मुद्दा राज ठाकरे यांनी मांडला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देऊन महाराजांची समाधी ही छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली असल्याचे सांगितले. १८६९ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन समाधीस्थळी स्वच्छता केली. त्याची बातमी नारायण मेघजी लोखंडे यांनी दीनबंधू वर्तमानपत्रात छापून आणली होती. फुलेंचा पत्रव्यवहार, शाहू महाराजांचा पत्रव्यवहार आजही आर्काईजमध्ये उपलब्ध आहे. फुलेंनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पहिली सभा घेतली होती, त्या सभेला करवीर संस्थानचे प्रमुख आबासाहेब घाटगे उपस्थित होते. आबासाहेबांनी त्यांचे अभियंते रायगडावर पाठवले देखील होते. मात्र सहा महिन्यातच त्यांचे निधन झाले. कालांतराने महात्मा फुलेंचेही निधन झाल्यामुळे ही मोहीम थांबली. त्यानंतर १८९५ साली टिळकांनी हे काम हाती घेतले, त्यावेळचे सर्व संस्थानिकांना त्यांनी सोबत घेतले. लोकमान्य टिळक हे फक्त दोन वेळा रायगड किल्ल्यावर गेले होते, असे इतिहासात नमूद असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यांनी नाना फडणवीसांचे छायाचित्र सिंहासनावर ठेवल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. १९२० साली टिळकांचे निधन झाले, तोपर्यंत समाधीसाठी काहीही काम झाले नव्हते. त्यांनी समाधी जीर्णोद्धार समिती स्थापन केली होती, त्यासाठी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी ज्या बँकेत ठेवला होता, ती बँक बुडाल्याचे सांगितले गेले. समाधी जीर्णोद्धार समिती काम करत नसल्यामुळे १९२६ साली ब्रिटिशांनी समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम स्वतःकडे घेतले. या इतिहासावर मी कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहे. वर्तमान इतिहासकारांनाही हे संदर्भ माहीत आहेत. इतिहास असा कुणाच्याही नावावर खपवता येत नाही. चुकीचा इतिहास सांगूनच आमचे वाटोळे केले, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.