राज ठाकरे म्हणाले, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 06:34 IST2025-10-26T06:34:34+5:302025-10-26T06:34:34+5:30
गल्ली ते दिल्लीपर्यंत या मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा - राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी
मुंबई : महाविकास आघाडीचा मोर्चा असला तरी मनसेने त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली. बैठकीत मोर्चाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. यावेळी हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे. हा मोर्चा खोट्या मतदारांसाठी नाही, तर खऱ्या मतदारांसाठी आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
गल्ली ते दिल्लीपर्यंत या मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा. आयोजन ठोस, प्रभावी आणि न भूतो न भविष्यती असावे, असे निर्देश राज यांनी बैठकीत दिले. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, गजानन काळे, यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
ही लढाई लोकशाहीची गरज : खा. राऊत
मतदार यादीतील घोळविरोधात महाविकास आघाडीने १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली असून, यामध्ये मनसेही सहभाग होणार आहे. या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांनी शिवतीर्थ येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी भेट घेतली. खा. राऊत यांनी म्हटले, ही लढाई लोकशाहीची गरज आहे. निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल, तर त्यांना दणका द्यावाच लागेल.