महाराष्ट्रावर आज ११ लाख कोटींचे कर्ज; गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंची हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 20:57 IST2026-03-19T20:56:17+5:302026-03-19T20:57:27+5:30
Raj Thackeray MNS Melava : 'सध्या लोकांना मोबाईल, आयपीएल, टीव्ही आणि चित्रपटांमध्ये गुंतवून ठेवले जात आहे, जेणेकरून ते सरकारला प्रश्न विचारणार नाहीत.'

महाराष्ट्रावर आज ११ लाख कोटींचे कर्ज; गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंची हल्लाबोल
Raj Thackeray MNS Melava : दरवर्षीप्रमाणे आजही मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका करत सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि शहरी परिस्थितीवर भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले की, सध्या लोकांना मोबाईल, आयपीएल, टीव्ही आणि चित्रपटांमध्ये गुंतवून ठेवले जात आहे, जेणेकरून ते सरकारला प्रश्न विचारणार नाहीत. नागरिक आता रस्त्यावर येण्याऐवजी मोबाईलवरच आपला राग व्यक्त करतात. ही परिस्थिती केवळ भारतातच नाही, तर जगभरात दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
माध्यमांवरही दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, बातम्या दाखवू नयेत, यासाठी दबाव टाकला जातो आणि पत्रकारांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे नागरिकांपर्यंत खरी माहिती पोहोचत नाही. राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री अशताना राज्यावर सुमारे २ लाख कोटींचे कर्ज होते, ते आता वाढून ११ लाख कोटींवर पोहोचले आहे. ‘विकासा’च्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी शहरांमधील वाढते ट्रॅफिक, अतिक्रमणांनी भरलेले फुटपाथ आणि कमी होत चाललेली मैदाने याकडे लक्ष वेधले.
तसेच, वाढत्या अनियंत्रित शहरीकरणावर त्यांनी टीका केली. कुठेही इमारती उभारल्या जात आहेत आणि आवश्यक परवानग्या सहज दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील काही वर्षांत शहरांमधील जीवन अधिक कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. ग्रामीण भागातील तरुण शेतीकडे वळत नसल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात तीन वेळा कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पावर टीका करत त्यांनी हा प्रकल्प बाहेरील लोकांसाठी असून स्थानिकांना त्याचा फायदा होत नसल्याचे म्हटले.