राज ठाकरे दिल्लीकडे रवाना, फडणवीसही पोहोचले; राज्यात मोठी राजकीय उलथापालथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 19:26 IST2024-03-18T19:23:48+5:302024-03-18T19:26:11+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत पोहोचले आहे.

राज ठाकरे दिल्लीकडे रवाना, फडणवीसही पोहोचले; राज्यात मोठी राजकीय उलथापालथ
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी मनसे-भाजपा-शिवसेना या तिन्ही पक्षात चर्चा सुरू असून लवकरच याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येणार आहे. परंतु मनसेला महायुती घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे आजचे दौरेही रद्द झाले होते. राज ठाकरे आज दक्षिण मुंबईसह इतर भागात मतदारसंघनिहाय दौरा करणार होते. मात्र, राज ठाकरेंचे दौरे रद्द झाल्यानंतर अचानक त्यांचा दिल्ली दौरा असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे आज रात्री दिल्लीत पोहोचतील, अशी माहिती समजते. त्यामुळे, महायुतीत मनसे सोबत येणार असल्याची जोरदार खलबते सुरू आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत भाजपा-मनसेत युती होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रखर हिंदुत्त्वाची भूमिका घेतली असून भाजपा नेत्यांसोबत, विशेषत: देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची जवळीक वाढल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काही वेळापूर्वीच मनसेच्या महायुतीतील चर्चेवर लवकरच योग्य निर्णय होईल, असे म्हटले होते.
मनसे-भाजपा-शिवसेना यांच्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. मागील वर्षभरात राज ठाकरे आणि भाजपा-शिवसेना नेत्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंसोबत गाठीभेटी सुरू होत्या. मनसेला महायुतीत कसं सोबत घ्यायचं यावर गेल्या काही महिन्यांपासून चाचपणी सुरू होती. दिल्लीतही मनसेबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली. नेमका फॉर्म्युला कसा असावा यावर चर्चा होत होती. मनसेला सोबत घेतले तर त्यांना कोणाच्या कोट्यातून जागा द्यायची यावर विचार सुरू होता.