Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतका अवाढव्य खर्च वल्लभभाईंना तरी कसा पटेल?, राज ठाकरेंनी भाजपाला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 10:10 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

मुंबई -  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुतळ्यांच्या राजकारणावरुन भाजपा सरकारला चांगलेच फटकारले आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपा सरकारवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. 2389 कोटी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केलेल्या ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ पुतळ्याचे अनावरण 31 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. 31 आॅक्टोबरला रोजी सरदार पटेल यांच्या जयंती दिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीतून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. 

(वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण)

काय म्हटले आहे राज ठाकरे यांनी?

अरे, तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका खर्च अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना !... पुतळ्याचा खर्च 2290 कोटी... वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, अशा शब्दात राज यांनी भाजपाला फटकारले आहे.

दरम्यान, यापूर्वीही राज ठाकरे यांनी पुतळ्यांना आपला विरोध असल्याचे म्हटले होते. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही त्यांनी तीव्र विरोध केला होता. पाच हजार कोटी खर्चून महाराजांचा पुतळा उभारण्यापेक्षा महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची भूमिका ठाकरे यांनी मांडली होती. मोदी यांनीच सर्वप्रथम पटेल यांच्या स्मारकाची संकल्पना मांडली होती. ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ च्या नावाने सरदार पटेलांचे स्मारक बांधण्याचा निर्धार मोदींनी व्यक्त केला होता. अमेरिकेतील 'स्टॅच्यू आॅफ लिबर्टी'पेक्षा सरदारांचे स्मारक उंच असेल, अशी घोषणाही त्यांनी केली होती. 

सरदार पटेल यांच्या स्मारकाची वैशिष्ट्यं-३१ आॅक्टोबर २०१३ रोजी मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले. आता ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी त्यांच्याच हस्ते स्मारकाचे उद्घाटन होणार आहे.- पटेल यांचे हे स्मारक अमेरिकेतील स्वातंत्र्य देवतेच्या दुप्पट उंचीचे आहे. लार्सन अँड टुब्रो ने स्मारकाच्या बांधणीचे काम केले असून त्यासाठी २,९८९कोटींचा खर्च आला.- स्मारकातील पटेल यांच्या पुतळ्यात २०० लोक बसू शकतील, अशी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीतून सातपुरा आणि विध्यांचल डोंगर रांगातील नर्मदा नदीचे खोरे आणि सरदार सरोवराचा परिसर पाहता येणार आहे.- थ्री स्टार हाॅटेल, म्युझियम, आॅडिओ-व्हिज्युअल गॅलरीदेखील उभारण्यात आले आहे. सरदार पटेलांचे जीवनचरित्र मांडतानाच या स्मारकाच्या माध्यमातून पर्यटन वाढीला पूरक अशी मांडणी करण्यात आली आहे.

नितीशकुमार, उद्धव ठाकरे समारंभाला जाणार नाहीत?

दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केलेल्या ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ पुतळ्याच्या अनावरणाला सर्व मुख्यमंत्र्यांनी हजर राहावे, यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करीत आहेत. हा समारंभ ३१ आॅक्टोबर रोजी होईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यास न जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार, के. सी. आर. पलानीस्वामी उपस्थित असावेत, असे मोदी यांना वाटते. परंतु, नितीश कुमार उत्सुक नाहीत. तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, ओदिशाचे नवीन पटनाईक व तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उपस्थित राहावे यासाठीही प्रयत्न होत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य व प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राम मंदिर चळवळीत आम्ही व्यग्र आहोत.’

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदीभाजपा