नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते!; राज ठाकरेंचा बाबा रामदेव यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 19:54 IST2018-12-28T19:35:53+5:302018-12-28T19:54:51+5:30

राज ठाकरे यांनी नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते असा टोला बाबा रामदेव यांना लगावला आहे.

raj thackeray cartoon on baba ramdev suggest to netrasan | नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते!; राज ठाकरेंचा बाबा रामदेव यांना टोला

नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते!; राज ठाकरेंचा बाबा रामदेव यांना टोला

मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी योगगुरु बाबा रामदेव यांनी पुढील पंतप्रधान कोण होईल याबाबत सांगणे कठीण असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून बाबा रामदेव यांना टोला हाणला आहे. 

राज ठाकरे यांनी नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते असा टोला बाबा रामदेव यांना लगावला आहे. व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी बाबा रामदेव, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दाखवले आहे. तसेच, बाबा रामदेव हे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याकडे पाहत असल्याचे दाखविले आहे. याचबरोबर, 'नेत्रासन - हे आसन केल्याने दृष्टी सुधारते!, भारताचा पुढील पंतप्रधान कोण होईल हे सांगता येत नाही!' असे लिहिले आहे. तर कंसात मोदी प्रशंसक असे लिहून बाबा रामदेव यांच्यावर निशाना साधला आहे. एकंदरीत काय तर राज ठाकरे यांनी बाबा रामदेव यांना नेत्रासन करण्याचा सल्ला दिला आहे.


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देशातील राजकीय घडामोडींमध्ये रस दाखविणारे बाबा रामदेव यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत खळबळ उडवून दिली होती. देशातील राजकीय परिस्थिती खडतर बनली असून पुढचे पंतप्रधान कोण असतील याबाबत काहीच सांगू शकत नाही. मी राजकारणावर लक्ष केंद्रीत केलेले नाही आणि कोणाला पाठिंबाही किंवा विरोधही केलेला नाही. आम्हाला जातीयवादी किंवा हिंदूंचा देश नकोय, तर अध्यात्मिक देश हवा आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले होते.   
 

Web Title: raj thackeray cartoon on baba ramdev suggest to netrasan