"आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 18:25 IST2022-06-12T18:24:49+5:302022-06-12T18:25:15+5:30

ट्विटरवर ऑडियो क्लिप शेअर करत केली घोषणा

Raj Thackeray Big Announcement declares that he does not want to take any risk so he will not meet anyone on his upcoming birthday  | "आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

"आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

Raj Thackeray Big Announcement: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय व्यासपीठ आणि चर्चांपासून दूर आहेत. राज ठाकरे यांच्या हिप बोनवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ते आवश्यक ती काळजी घेत आहेत. या दरम्यान, राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस आहे. या अनुषंगाने राज यांनी त्यांच्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना एक आवाहन केलं आहे. एका ऑडियो क्लिपच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की, माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या एका डेड सेल मुळे ती शस्त्रक्रिया नियोजित वेळी करता आली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी १०-१५ दिवस घरात क्वारंटाइन राहिलो आहे. आता पुढील आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र याच दरम्यान, येत्या मंगळवारी (१४ जून) माझा वाढदिवस आहे. या वाढदिवशी दरवर्षी अनेक महाराष्ट्र सैनिक मला भेटतात. त्यातून त्यांना आणि मलाही समाधान मिळतं. पण या वर्षी मात्र मला वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नये, कारण मला कोणालाच भेटता येणार नाही.

पुढे राज ऑडियो क्लिपमध्ये असेही म्हणाले की, माझ्या शस्त्रक्रियेला आधीच विलंब झाला आहे. जर या वाढदिवशी बाहेरून काही लोक मला भेटले आणि त्यांच्याशी माझा संपर्क आल्याने पुन्हा कोविड किंवा काही त्रास झाला तर पुन्हा ही शस्त्रक्रिया लांबवावी लागेल. त्यामुळे यंदा कोणीही मला भेटायला येऊ नका. कारण शस्त्रक्रिया किती काळ लांबवायची यालाही मर्यादा आहेत. आपण सारे जिथे आहात तिथेच राहा आणि शुभेच्छा द्या. शस्त्रक्रियेनंतर मी तुम्हा सर्वांना निश्चित भेटेन. पण सध्या मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही, त्यामुळे १४ तारखेला वाढदिवशी मी कोणालाही न भेटण्याचा निर्णय केला आहे, अशी घोषणा राज यांनी ट्वीटवरून केली.

Web Title: Raj Thackeray Big Announcement declares that he does not want to take any risk so he will not meet anyone on his upcoming birthday