महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी एकत्र यावं, असं अनेकांना वाटतं. हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलून जाईल, अशीही अनेकांना आशा आहे. मात्र दोन वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करत असलेले हे भाऊ एकत्र येण्याबाबत अद्याप तरी सकारात्मक संकेत मिळालेले नाहीत. मात्र मुंबईतील एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मुंबईतील अंधेरी परिसरात आज शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नसोहळा झाला. या लग्नसोहळ्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या विवाह सोहळ्यादरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली. तसेच त्यांनी एकमेकांशी औपचारिक संवाद साधला. यावेळी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. मागच्या तीन महिन्यात कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने झालेली ही तिसरी भेट आहे.
दरम्यान, राज आणि उद्धव ठाकरे हे या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्याने तसेच त्यांच्यामध्ये औपचारिक संवादही झाल्याने भविष्यात दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्याही एकत्र येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.