मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:50 IST2025-07-04T11:49:13+5:302025-07-04T11:50:19+5:30
Raj-Uddhav Thackeray Melava 2025: ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं दोन्ही पक्षाकडून अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं जात आहे.

मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
वरळीच्या डोममध्ये उद्या ठाकरे बंधुंचा मराठी विजयी मेळावा होणार आहे. दोन्ही बंधुंनी या मेळाव्याकडे राजकीय लेबल न लावता मराठी भाषेचा विजय म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. पण असं असलं तरी तब्बल १८ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर भाषण करताना पाहायला मिळणार असल्यानं या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं दोन्ही पक्षाकडून अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार अनिल परब आणि मनसेकडून बाळा नांदगावकर यांनी नुकतीच कार्यक्रम स्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांकडे या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात एक बैठक गुरुवारी पार पडली. ज्यात कार्यक्रमाची रुपरेषा कशी असावी? कुणाची भाषणं व्हावीत? मुख्य मंचावर कोणकोण असतील? हे सगळं निश्चित करण्यात आलं आहे. दोन्ही बाजूंकडून १५ मुद्द्यांवर एकमत झालं आहे.
ठाकरेंच्या मेळाव्याच्या नियोजनाचे १५ मुद्दे पुढीलप्रमाणे...
1 > मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधुंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम शुक्रवारी केली जाणार आहे.
2 > मेळाव्यात केवळ ठाकरे बंधुंची भाषणे होणार आहेत. इतर पक्षांचे अध्यक्ष आल्यास केवळ पक्षाध्यक्षांचीच भाषणे होतील असं ठरलं आहे.
3 > व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांनाच स्थान दिले जाणार आहे. इतर सर्व नेते खाली व्यासपीठासमोर बसणार आहेत.
4 > दोन्ही ठाकरे बंधू आणि इतर सहकारी पक्षांचे अध्यक्ष आले तर ते अशी मोजकी भाषणं होतील. इतर नेत्याची भाषणे होणार नाहीत.
5 > संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील व्यासपीठाच्या खालीच असणार.
6 > सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसनव्यवस्था असणार आहे.
7 > मेळाव्याचा केंद्रबिंदु मात्र ठाकरे बंधुच राहणार आहेत.
8 >मुंबईत जिथे शक्य असेल तिथे एलईडी स्क्रीन लावल्या जाणार आहेत. विजयी मेळाव्याचं थेट प्रक्षेपण लोकांना पहाता येणार आहे.
9 > दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि त्यांचे नेते आपापला पक्षीय अहंकार (इगो) बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी झोकून देऊन काम करतील असं ठरलं आहे.
10 > गर्दीचे नियोजन ही मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे.
11 > दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करुन जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे.
12 > वरळी डोममध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरीही कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत.
13 > वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाणार आहे.
14 > बॅनरबाजी, पोस्टर, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचले जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना केल्या जाणार आहेत.
15 > सोशल मिडीया, बॅनर; जाहिरातींद्वारे या मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाण्याची जबाबदारीही दोन्ही पक्षांच्या विशेष टीमकडे सोपवण्यात आली आहे.