"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:31 IST2025-12-28T13:29:18+5:302025-12-28T13:31:56+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसची 'एकला चलो रे'ची भूमिका पाहायला मिळत आहे.

"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
Sanjay Raut: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीत सोबत राहावे, अशी आमची आणि स्वतः राज ठाकरे यांचीही इच्छा होती, असे राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी आणि परप्रांतीयांबाबतच्या भूमिकेमुळे काँग्रेसने या युतीपासून दूर राहून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे होते. राऊत यांच्या दाव्यानुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काँग्रेसला सोबत घेण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. "आम्ही काँग्रेसला त्यांना हव्या असलेल्या जागा देण्यासाठी तयार होतो. काँग्रेसला ज्या जागा हव्या आहेत त्या देण्यासाठी आमचे एकमत होते. स्वतः राज ठाकरे यांचीसुद्धा तीच भूमिका होती. सगळ्यांनी एकत्र राहावं. पण राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही ही भूमिका योग्य नाही. आम्हाला भाजपच्या राक्षसांचा पराभव करायचा आहे," असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव-राज युती आणि काँग्रेसची एग्झिट
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढली होती. २४ डिसेंबर २०२५ रोजी दोन्ही भावांनी औपचारिकपणे महानगरपालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. मराठी माणूस आणि मुंबईचे हित या मुद्द्यावर हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. मात्र, राज ठाकरेंची एन्ट्री होताच काँग्रेसने सावध पवित्रा घेतला. काँग्रेसने स्पष्ट केले की, राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय विरोधी कट्टर भूमिकेमुळे काँग्रेस त्यांच्यासोबत एकाच मंचावर येऊ शकत नाही.
वर्षा गायकवाड यांची आक्रमक भूमिका
मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी राज ठाकरेंच्या समावेशाला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, "काँग्रेस ही सर्वसमावेशक विचारधारेचा पक्ष आहे. आम्ही अशा शक्तींसोबत जाऊ शकत नाही ज्या समाजात दुही निर्माण करतात किंवा विशिष्ट समुदायाला लक्ष्य करतात." मुंबईत मोठ्या संख्येने असलेल्या उत्तर भारतीय आणि अमराठी मतदारांना गृहीत धरून वर्षा गायकवाड यांनी राज ठाकरेंशी हातमिळवणी करणे धोक्याचे असल्याचे पक्षश्रेष्ठींना पटवून दिले. "आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत, पण जिथे मनसे असेल तिथे काँग्रेस नसेल," असे म्हणत त्यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अद्याप सावध भूमिका घेतली असली तरी, काँग्रेसने मात्र 'स्वातंत्र्य लढण्याची' म्हणजेच स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केली आहे. यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू विरुद्ध काँग्रेस असा त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.