गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरावर ढग दाटू लागले होते. अखेर मंगळवारी रात्री मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये तुफान पाऊस झाला. त्यामुळे कामावरून घरी निघालेल्या प्रवाशांची फजिती झाली. रात्री सुरू झालेल्या पावसाची संततधार मध्यरात्रीपर्यंत कायम होती. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. तर मुंबई लोकल सेवाही संथ झाली होती. पावसाचे पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. रात्री पावसाचा जोर चांगलाच वाढला. याचा परिणाम मुंबईच्या मध्य लोकल सेवेवरही झाल्याचे दिसून आले.
रस्त्यांवरून वाहू लागले पाणी
पावसाचा जोर इतका होता की, अवघ्या काही तासांतच अनेक ठिकाणी पाणी पाणी रस्त्यावरून वाहू लागले होते. मुंबईसह कांदिवली, गोरेगाव,मालाड, दहिसर या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अंधेरी झालेल्या संततधार पावसाने भुयारी रेल्वे मार्गा पूर्णपणे पाण्याखाली गेला.
अंधेरी भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याचा उपसा करण्याचे काम बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे. पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.
पवईमध्ये झाड कोसळले
मुंबईतील पवई परिसरात असलेल्या जलवायु कॉम्प्लेक्स जवळ एक मोठे झाड वादळी वारा आणि पावसामुळे उन्मळून पडले. रस्त्यावरच हे झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मुंबई, कोकणाला यलो
हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. २१ मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.