मुंबईसह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा इशारा कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 07:22 PM2020-12-11T19:22:01+5:302020-12-11T19:22:17+5:30

Rain warning : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र 

Rain warning to Mumbai, North Central Maharashtra and Vidarbha | मुंबईसह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा इशारा कायम 

मुंबईसह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा इशारा कायम 

Next

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी सकाळी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या काही परिसरात पावसाची नोंद झाली आहे. सकाळी दाखल झालेल्या पावसाच्या रिमझिम सरी दुपारपर्यंत काही ठिकाणी हलक्या स्वरुपात कोसळत होत्या. तर किंचित काही ठिकाणी पडलेले तुरळक ऊनं वगळता उर्वरित मुंबई गुरुवारप्रमाणे ढगाळच होती. शनिवारी देखील मुंबईत सर्वसाधारणपणे असेच वातावरण असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबईकरांची सकाळच पावसाने उजाडली. मुंबईत सर्वदूर ठिकठिकाणी पावसाची नोंद होत होती. रिमझिम सुरु असलेला हा पाऊस मुंबई आणि नवी मुंबईत हजेरी लावत होता. दक्षिण मुंबईसह मुंबईच्या उपनगरात दूरवर सरीवर कोसळत होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबईत बहुतांश ठिकाणी असेच वातावरण होते. दुपारीदेखील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी नोंदविण्यात आल्या. दुपारी काही काळ किचिंत ऊनं पडले. मात्र पुन्हा संपुर्ण दुपार ढगाळ वातावरणाने भरून गेली होती. दिवसभर मुंबईवर ढगाळ वातावरण असल्याने जणूकाही सकाळी आणि दुपारीच मुंबईत सायंकाळ झाली आहे, असे भासत होते. सायंकाळी सुर्यास्तालादेखील मुंबई ढगाळ हवामानाने व्यापून गेली होती.

-------------------

अंदाज

१२ आणि १३ डिसेंबर : उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
१४ आणि १५ डिसेंबर : विदर्भात  तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
१२ आणि १३ : मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश ढगाळ राहील. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.

-------------------

पुणे आणि मुंबई २८ अंशावर

शुक्रवारी पडलेल्या पावसाने मुंबईच्या सकाळच्या वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला होता. तर शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान २८.८ तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारी मुंबई आणि पुण्याचे कमाल तापमान एकसारखे म्हणजे २८.८ एवढे नोंदविण्यात आले आहे.

-------------------

तापमान घसरले

मुंबईच्या कमाल तापमानात गेल्या ३ दिवसांच्या तुलनेत ७ अंशानी घसरण झाली आहे. ढगाळ हवामानादरम्यान तापमानात झालेली वाढ आणि पावसानंतर हवामानात झालेल्या बदलांनंतर तापमानात घसरण झाली आहे.

-------------------

मुंबईचे कमाल तापमान

९ डिसेंबर - ३६
१० डिसेंबर - ३३.४
११ डिसेंबर - २८.८

-------------------
 

Web Title: Rain warning to Mumbai, North Central Maharashtra and Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.