मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:33 IST2025-08-19T20:23:57+5:302025-08-19T20:33:55+5:30
मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली होती. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला

मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
मुंबई - मुसळधार पावसामुळे एकीकडे लोकल सेवा ठप्प झाली असताना दुसरीकडे तांत्रिक कारणाने मोनो रेल्वे बंद पडल्याची घटना घडली आहे. चेंबूर आणि भक्तीपार्क यामध्ये मोनोरेल अडकून पडली आहे. या ट्रेनमधील प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू करत बाहेर काढले आहे. मात्र हा प्रकार का घडला याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तांत्रिक कारणामुळे मोनो रेल बंद पडली आहे. त्याठिकाणी एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल असं त्यांनी सांगितले.
काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2025
तर दुसरीकडे मोनो रेलमधील अडकलेल्या प्रवाशांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. संबंधित यंत्रणा या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत असल्याचं त्यांनी सांगितले. त्याशिवाय कुणीही घाबरू नका, एकमेकांना धीर द्या असं शिंदेंनी प्रवाशांना सांगितले. पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात हार्बर मार्गावरील प्रवासी मोनोरेलला पोहचले. त्याठिकाणी अधिकच्या क्षमतेमुळे मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. २ तास प्रवासी मोनोरेलमध्ये अडकले होते. त्यानंतर महापालिका यंत्रणेकडून या प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आले आहे.
दरम्यान, मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली होती. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचनेनुसार प्रवाशांच्या सेवेसाठी 'बेस्ट'च्या सुमारे चार ते पाच बस पाठवण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना करण्यात आले आहे असं महापालिकेने सांगितले.
२ तास मोनो रेल्वेत प्रवासी अडकले, यंत्रणेकडून रेस्क्यू ऑपरेशन, प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे. दरवाजे, काचा बंद असल्याने प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास #Mumbai#MonoRail#MumbaiRainAlertpic.twitter.com/bXuG53kLK6
— Lokmat (@lokmat) August 19, 2025