भुयारी मेट्रोत पावसाचा राडा, चौफेर टीका; आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात शिरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 05:39 IST2025-05-27T05:39:00+5:302025-05-27T05:39:34+5:30
प्लॅटफॉर्मवर चिखल, पायऱ्या, स्वयंचलित जिने झाले धबधबे; मंत्रालय परिसरही जलमय

भुयारी मेट्रोत पावसाचा राडा, चौफेर टीका; आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात शिरले पाणी
मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वेगाने एंट्री घेतलेल्या मान्सूनने मुंबईतील महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो प्रकल्पाला सोमवारी जबरदस्त फटका दिला. मुसळधार पावसाने कफ परेड ते आरे मेट्रो ३ मार्गिका पाण्याखाली गेल्या. त्यातही वरळीच्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाला अक्षरश: धबधब्याचे स्वरूप आले होते. दुसरा टप्पा सुरू होऊन पंधरा दिवसातच या मेट्रोच्या स्थानकात पावसाच्या पाण्याचा लोंढा आल्याने या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले आहे. या घटनेनंतर मुंबई मेट्राे देशभर ट्राेल झाली.
भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा दुसरा टप्पा १० एप्रिलपासून प्रवासी सेवेत दाखल झाला. मात्र, पहिल्याच मुसळधार पावसात या मार्गावरील निकृष्ट कामे समोर आली. आचार्य अत्रे चौक स्थानकात प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गातील संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली वॉटर रिटेनिंग भिंत मुसळधार पावसामुळे कोसळल्याने पावसाचे पाणी थेट स्थानकात शिरले. तसेच स्लॅबचा काही भाग कोसळला.
वेगाने आलेले पाणी थेट मेट्रो मार्गिकेच्या रुळांपर्यंत पोहचले. तसेच, स्थानकात सर्वत्र गाळ साचला. ऐन प्रवासी वाहतूक सुरू असताना ही घटना घडली. मात्र, त्यानंतर आचार्य अत्रे स्थानकावरील प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आली.
दरम्यान या घटनेनंतर वरळी ते आचार्य अत्रे चौक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. मात्र वरळी ते आरे मार्गावर सेवा नियमितपणे सुरू होती. या मार्गावर दुपारी ४ वाजेपर्यंत २४ हजार प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली.
वरळी नाका येथील डॉ. ॲनी बेझंट रोडलगत असलेल्या भागात सांडपाणी निःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) केला.
पाणी शिरलेल्या मेट्रो स्थानकात प्रवेशद्वाराचे काम सुरू होते. तसेच, हा भाग प्रवाशांसाठी खुला केलेला नव्हता, असे एमएमआरसीने म्हटले आहे. या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि सुरक्षा पथकाने घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन प्रतिबंधात्मक कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत, असेही एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तिकीट खिडकी आणि मेट्रो मार्गावर प्रवेश करण्यापूर्वी उभारण्यात आलेल्या सुरक्षा तपासणी यंत्रणेला हानी पोहचली असून, स्थानकातील सर्वच यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, नक्की किती नुकसान झाले याची माहिती एमएमआरसीने दिली नाही.
तात्पुरत्या संरक्षण भिंतीचे कारण
या स्थानकाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ज्या भागातून पाणी शिरले तो मार्ग येण्याजाण्यासाठी वापरण्यात येत नव्हता. हे काम ३ महिन्यांत पूर्ण होणार आहे. तोपर्यंत तेथून पाणी येऊ नये, म्हणून तात्पुरत्या संरक्षक भिंतीचे काम १० जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र त्याआधीच पाऊस आला. लगतच्या भागातून आलेल्या पाण्यामुळे ही भिंत पडली, असे एमएमआरसीचे म्हणणे आहे. मात्र मुंबईत मुसळधार पाऊस पडतो, हे माहीत असूनही ही संरक्षक भिंत आधी का उभारली गेली नाही, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.