Join us  

महाआघाडीच्या घोषणेवेळी राधाकृष्ण विखे गायब, तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:46 PM

मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीसोबत असलेल्या पक्षांची माहिती दिली.

मुंबई - मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह संयुक्त पुरोगामी आघाडीची महत्त्वाची बैठक होऊन पत्रकार परिषदही घेण्यात आली. मात्र, या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनली होती. काही दिवसांपूर्वीच पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजपाप्रवेशामुळे राजकीयदृष्ट्या कोंडित सापडलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा होती. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती हा लक्षवेधी ठरली आहे. 

मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीसोबत असलेल्या पक्षांची माहिती दिली. त्यानंतर, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील युती सरकारवर टीका केली. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांसह इतरही नेते उपस्थित होते. जयंत पाटील यांनीही सरकारवर टीका करताना, शेतकऱ्यांची फसवणूक या सरकारने केल्याचं म्हटलंय. आघाडीच्या वतीने संयुक्त पुरोगामी महाआघाडीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये, राजू शेट्टीसंह लहानमोठ्या पक्षांचाही समावेश झाला आहे. मात्र, या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांची अनुपस्थिती दिसल्याने पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे. मात्र, यापूर्वीही राजीनाम्याची चर्चा झाल्यानंतर त्यांनी स्वत:च या वृत्ताचा इन्कार केला होता. तर ‘मी आता काय कोणती भूमिका घेऊ?’ अशी विचारणा विखे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केल्याचे त्यांनी म्हटले.

मुलाच्या भाजपा प्रवेशानंतर, निवडणूक प्रचारात विरोधी पक्ष नेतेच जर त्यांच्या जिल्ह्यात पक्षाचे काम करणार नसतील तर पक्षासाठी काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणत्या तोंडाने जाब विचारायचा, असा प्रश्न काँग्रेसमधील अन्य नेत्यांना पडला आहे. त्यामुळे विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढत आहे. दरम्यान, डॉ. सुजय विखे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही भेटायला गेले होते. त्यांच्याशी बोलून निघताना ‘तुम्ही काहीही निर्णय घ्या, पण मी उभे राहणारच आहे’ असे त्यांनाही ऐकवले होते. त्यामुळे पवारांचीही नाराजी त्यांनी ओढावून घेतली. विखे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन सुजय माझे ऐकत नाही, असे गाऱ्हाणे घातले होते. त्यावर राहुल गांधी यांनी सुजयशी फोनवर बोलणे केले होते. तुम्हाला नंतर योग्य संधी देऊ, आता तुम्ही पक्ष सोडू नका, असेही सांगितले होते. तरीही सुजय यांनी भाजपात प्रवेश केला.

टॅग्स :काँग्रेसअशोक चव्हाणजयंत पाटीलराधाकृष्ण विखे पाटील