Question marks over concessional ‘art’ qualities; There is no planning of examinations from the Directorate of Arts | सवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही

सवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील विविध स्तरावर कला शिक्षणाला महत्त्व असून विशेषतः दहावीच्या शिक्षण मंडळाच्या बोर्डाच्या परीक्षेत या विषयाच्या सवलतीच्या गुणांचा फायदा विद्यार्थ्यांना होताे. मात्र यंदा हे सवलतीचे गुण मिळणार की नाहीत, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील सर्व विद्यार्थ्यांची शासकीय रेखा कला परीक्षा घेता येणार नसल्याचे कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी स्पष्ट केले. यास अनुमती द्यावी, असे पत्र त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिले आहे.

शासकीय रेखा कला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिडीएट) राज्यात व राज्याबाहेर एकूण १,१३० केंद्रांवर घेण्यात येते. एका परीक्षा केंद्रावर सहभागी शाळांचे १० ते १५ विद्यार्थी प्रविष्ट हाेतात. अशा प्रकारे एका केंद्रावर एकूण सरासरी ५०० ते १००० विद्यार्थी परीक्षेला बसतात. असे एकूण तब्बल ६ ते ७ लाख विद्यार्थी या परीक्षांना हजेरी लावत असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. काेराेना व त्यामुळे मुलांचे आराेग्य तसेच सुरक्षेच्या दृष्टीने यंदा परीक्षांचे नियोजन अद्याप झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला आणि इतर विषयांच्या सरासरी गुणांएवढे गुण त्या विषयाला देण्यात आले. याच धर्तीवर दहावीतील विद्यार्थ्यांनी यापूर्वी एलिमेंटरी किंवा इंटरमिडीएट ड्रॉईंग परीक्षा दिली असेल त्याला त्या आधारावर शैक्षणिक गुण द्यावेत, अशी मागणी राज्यातील विविध कलाध्यापक संघटनांनी कला संचालनालयाकडे केल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मागण्यांची निवेदनेही शालेय शिक्षण विभागाकडे निर्णय घेण्यासाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शिक्षण विभाग काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

असे मिळतात सवलतीचे कला गुण
दहावीच्या विद्यार्थ्यांना इंटरमिडीएट ड्रॉईंग परीक्षेत ए ग्रेड मिळाल्यास ७ गुण मिळतात. त्यांना याच परीक्षेत बी ग्रेड मिळाल्यास ५ गुण दिले जातात. तर, सी ग्रेड मिळाल्यास ३ गुण दिले जातात. विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय त्याला इंटरमिडीएट परीक्षेचे गुण मिळत नाहीत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Question marks over concessional ‘art’ qualities; There is no planning of examinations from the Directorate of Arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.