Join us  

जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल; रस्त्यावरील खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:21 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय असं मनसे नेते अमित ठाकरेंनी सांगितले.

ठळक मुद्देउच्च न्यायालयात वारंवार खोटं बोललं जात असेल तर जनतेच्या न्यायालयात त्यांना शिक्षा होऊ शकेलसत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही.राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - मुख्यमंत्री

मुंबई – रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अनेकजण जीव धोक्यात घालून प्रवास करतात. खड्ड्यांमुळे काहींनी प्राणही गमावले आहेत. आता पुन्हा एकदा खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल अशा शब्दात मनसे नेते अमित ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेवर भाष्य केले आहे.

याबाबत अमित ठाकरे(MNS Amit Thackeray) म्हणाले की, रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. त्यात उच्च न्यायालयात वारंवार खोटं बोललं जात असेल तर जनतेच्या न्यायालयात त्यांना शिक्षा होऊ शकेल असं त्यांनी सांगितले आहे.

कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आले तर संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे त्यालाही जबाबदार धरून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती व उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतली होती.

संपूर्ण रस्त्यांची कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत, त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, रस्त्यांच्या कामात गुणवत्तेवर सर्वोच्च भर देण्याबरोबरच रस्त्यांच्या कामासाठी कृती आराखडा तयार करावा, निधीची कमतरता पडू देणार नाही मात्र निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला नाही आणि कामात गुणवत्तेवर भर दिला गेला नाही तर कामचुकार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत केल्या.

भाजपानंही शिवसेनेला घेरलं

गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी खड्ड्यात घातले. तरी मुंबईतील रस्त्यांचे "रस्ते" लागले. आता धावाते दौरे करुन कारवाईचा आरडाओरड करुन काय सांगयताय? “मी कट-कमिशन खाल्ले तर बुडबुड घागरी!” तेच कंत्राटदार..त्याच निविदा..तिच थूकपट्टी..कसं पटणार मुंबईकरांना..खड्ड्यांनी पितळ उघडं केलं! पालिका पोर्टल म्हणतेय खड्डे ९२७ फक्त, महापौरांची धावाधाव, ४२००० खड्ड्यांचा दावा, ४८ कोटींचा निधी, शहरात रस्त्यांची चाळण..निकृष्ट दर्जाचे काम. मुंबईकर हैराण, कंत्राटदारांवर कारवाई करा म्हणायचं, पाठीमागच्या दाराने बिलं काढून कट-कमिशन खायचं.“सब गोलमाल है! अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

टॅग्स :अमित ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरेआशीष शेलारभाजपाखड्डे