'पुणेकरांनी एका गव्यास मारून दाखवले, चंद्रकांत पाटलांच्या कोथरुडमध्ये हे घडले'

By महेश गलांडे | Published: December 11, 2020 07:45 AM2020-12-11T07:45:03+5:302020-12-11T07:45:57+5:30

एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे.

'Punekar performed a song, it happened in Kothrud of Chandrakant Patil', shivsena sanjay raut on samana | 'पुणेकरांनी एका गव्यास मारून दाखवले, चंद्रकांत पाटलांच्या कोथरुडमध्ये हे घडले'

'पुणेकरांनी एका गव्यास मारून दाखवले, चंद्रकांत पाटलांच्या कोथरुडमध्ये हे घडले'

googlenewsNext
ठळक मुद्देएका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे.

मुंबई - पुण्याच्या कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत रानगवा आल्याने परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर, वनविभाग आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रानगव्याला पकडले, मात्र काही वेळातच या प्राण्यानं आपला जीव सोडला. रानगवा मेल्यानंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, नागरिकांच्या गोंधळामुळचे गवा बिथरला आणि त्याचा मृत्यू झाला, असे वनविभागाने सांगितले. आता, सामनाच्या अग्रलेखातूनही पुणेकरांनीच गव्याला मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतील, गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? पुणे तिथे काय उणे!, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला आहे. 

पुणे व आसपासच्या परिसरात अधूनमधून हिंसक, अमानुष घटना घडत असतात. मनुष्य आहे तेथे रावण आहेच, पण रावणातही किमान माणुसकी होती. अशोकवनात सूक्ष्म रूपाने घुसलेल्या हनुमानाच्या शेपटीला त्याने फक्त आग लावली, निर्घृणपणे ठार केले नाही, पण आपले पुणेकर दोन पावले पुढेच आहेत. शौर्य दाखविण्याच्या धुंदीत ते इतके निर्घृण झाले की, चुकून शहरात शिरलेल्या एका रानगव्यास हाल हाल करून मारले आहे. जंगलातील प्राणी मनुष्यवस्त्यांत घुसतात याचे मुख्य कारण मनुष्याने जंगलावर अतिक्रमण केले आहे. असा एक गवा पुणे परिसरात घुसला व मनुष्याच्या क्रौर्यामुळे मृत्युमुखी पडला. आम्ही वाघ वाचवतो, साप वाचवतो. बिबटे, हत्ती वाचवतो, पण एका गव्यास निर्घृणपणे मारतो, असे म्हणत पुणेकरांच्या कृत्याचा समाचार सामनातून घेण्यात आलाय.   

वाघ हा गव्याची शिकार करू शकतो. कळपात असेल तर गवाही वाघाला शिंगावर घेऊन आपटतो, पण पुण्यातील लोक हे वाघापेक्षा शूर झालेले दिसतात. त्यांनी एकटय़ादुकटय़ा गव्यास ठार केले आहे. कोविड-19 व लॉक डाऊन काळात जास्तच आराम फर्मावल्यामुळे पुणेकरांत हे जे हत्तीचे बळ संचारले आहे, त्याची दखल सरकारने वेळीच घ्यावी, असे म्हणत सरकारलाही रानगव्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याचे संपादक संजय राऊत यांनी सूचवलं आहे. 

सोशल मीडियावर गव'गवा'

बुधवारी पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले. गवा चुकल्यामुळे बिथरला होता. तो शेजारीच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून आल्याचा अंदाज वर्तवत पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल झाले. मदत कार्य रेस्क्यू ऑपरेशनानंतर गव्याला ताब्यातही घेतले. मात्र, काही वेळातच रानगव्याचा मृत्यू झाला. पुण्यातील या रानगव्याचे वृत्त सोशल मीडियात झळकताच, सोशल मीडियातून त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. अनेकांनी यावर मिम्सही तयार केले, तर काहींनी तुम्ही त्यांच्या जंगलात शिरलात, ते तुमच्या घरात शिरले, असे म्हणत त्यांची व्यथाही मांडली. तर, गव्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातूनही हळहळ व्यक्त करत त्यास श्रद्धांजली वाहण्यात आली. 

Web Title: 'Punekar performed a song, it happened in Kothrud of Chandrakant Patil', shivsena sanjay raut on samana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.