Join us

पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊण तासात कापता येणार; सेमी हायस्पीड रेल्वे लवकरच धावणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 17:40 IST

हा मार्ग १२०० दिवसांत म्हणजेच सुमारे ४ वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २५ हजार नोकऱ्या निर्माण होतील.

मुंबई : पुणे-नाशिक (२३५ किमी) मार्गावर २०० किलाेमीटर प्रतितास वेगाने ट्रेन धावणार आहे. यासाठी सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वे प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास केवळ १ तास ४५ मिनिटांत पूर्ण करता येईल. हा प्रकल्प महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पारेशनतर्फे (महारेल) राबविण्यात येत आहे.पुणे आणि नाशिक दरम्यान थेट रेल्वेमार्ग नाही. त्यामुळे रस्ते मार्गाने या प्रवासासाठी चार ते साडे चार तासांचा कालावधी लागताे. परिणामी पुणे-नाशिक मार्ग रेल्वेने जाेडण्याची मागणी अनेक वर्षापासून हाेती. पुणे-नाशिक रेल्वेमुळे ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, साखर आणि शेती उत्पादनांच्या महसुलात वाढ हाेईल. पुणे स्थानकातून सुटणारी ही ट्रेन हडपसरला एलिव्हेडेटड डेकवरून जाईल आणि त्यानंतर हडपसर ते नाशिक दरम्यान जमिनीवरूनच धावणार आहे. 

या रेल्वेच्या रुळांशेजारील नागरिकांना पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी रुळांखालून प्रत्येक ७५० मीटर एक्झिट/ओपनिंग मार्ग तयार करण्यात येणार आहे. हाय-स्पीड पॅसेंजर ट्रेन, मालगाडी एकाच ब्रॉडगेज ट्रॅकवरून धावतील, असे या या मार्गाचे डिझाइन तयार करण्यात येणार आहे. या मार्गावरील सेमी हायस्पीड ट्रेन ही पहिली कमी किमतीची ट्रेन असणार आहे. 

१०२ गावांमधील जमीन प्रकल्पासाठी हाेणार संपादित- पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि नाशिक तालुक्यातून ही रेल्वे धावणार आहे. - यासाठी पुणे, अहमदनगर आणि नाशिकमधील एकूण १०२ गावांमधील जमीन संपादित केली जाणार आहे.

सुमारे २५ हजार नोकऱ्या निर्माण होतील -सध्या  गेल्या वर्षी मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाच्या कामांना वेग आला आहे. पुणे आणि नाशिक दरम्यान  भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा मार्ग १२०० दिवसांत म्हणजेच सुमारे ४ वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २५ हजार नोकऱ्या निर्माण होतील.

टॅग्स :रेल्वेपुणेनाशिक