प्रतिमा जपा, बडेजाव नको, साधे राहा; PM नरेंद्र मोदींचा महायुतीच्या आमदार, मंत्र्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:03 IST2025-01-16T05:58:59+5:302025-01-16T07:03:24+5:30
Narendra Modi : महायुतीचा धर्म पाळून पुढे जा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत दिला.

प्रतिमा जपा, बडेजाव नको, साधे राहा; PM नरेंद्र मोदींचा महायुतीच्या आमदार, मंत्र्यांना सल्ला
मुंबई : सामान्य जनता बोलत नाही, पण तिचे तुमच्या कारभारावर बारीक लक्ष असते, तेव्हा चांगली प्रतिमा जपा, बडेजाव नको; साधे राहा. बदल्यांच्या फायली घेऊन फिरत बसू नका. महायुतीचा धर्म पाळून पुढे जा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत दिला.
आयएनएस सभागृहात झालेल्या दोन तासांच्या संवादात मोदी यांनी विकासविषयक काही आमदार, मंत्र्यांची मते जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी प्रास्ताविकात महायुतीचे मोठे यश आणि सरकारची भविष्यातील वाटचाल यावर मत व्यक्त केले.
मोदी यांनी त्यांच्या भाषणात तिन्ही पक्षांच्या मंत्री, आमदारांशी भावनिक संवाद साधताना काही कठोर मतेही व्यक्त केली. पैसा नाही तर चांगली प्रतिमा महत्त्वाची आहे.
मोदींमधील ममत्व जाणवले
तुम्ही कुटुंबाला किती वेळ देता, असा प्रश्न मोदी यांनी केला. कोणाच्या कुटुंबात २० वर्षे वयावरील मुलगी आहे, हात वर करा असे ते म्हणाले. आपल्या मुलींशी बोला, त्यांचे मन आणि मते जाणून घ्या. तुम्ही आमदार, मंत्री आहात पण आधी घराचा आधार आहात हे ध्यानात घ्या, अशी भावना मोदींनी व्यक्त केली तेव्हा त्यांच्यातील ममत्व सर्वांनाच जाणवले.
महायुतीत समन्वय राखा
बदल्यांच्या फायली घेऊन फिरू नका, या शब्दात त्यांनी सगळ्यांचे कान टोचले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना बदल्यांच्या अनेक फायली यायच्या, मी ते बंद केले होते, असेही ते म्हणाले. महायुतीच्या तीन पक्षांमधील समन्वय खाली गावांपर्यंत गेला पाहिजे. तिन्ही पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यक्रम, सभांना जायला हवे. डबे पार्टी करा, असा सल्लाही मोदी यांनी दिला.
फडणवीसांचा ‘देवाभाऊ’ असा उल्लेख
मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख ‘देवाभाऊ’ असा करत त्यांच्या नेतृत्वात चांगले सरकार सक्षमपणे चालेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
संघकार्याची केली प्रशंसा
नि:स्पृहपणे जनसेवा कशी करायची हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकायला हवे. संघकार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, अशी भावनाही मोदी यांनी बोलून दाखविली.
९०% देश मी पंतप्रधान होण्याआधी पाहून झालेला होता. मला या गोष्टीचा खूपच फायदा झाला. तुम्हीही फिरले पाहिजे, खेड्यात मुक्कामी राहिले पाहिजे, संवाद वाढविला पाहिजे, अशा अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
योग आणि प्राणायम करा
सर्वांनी रोज योगासने, प्राणायम आणि ध्यानसाधना करावी. वर्षातून किमान दोन वेळा स्वत:च्या संपूर्ण आरोग्य तपासण्या कराव्यात, व्यसनांपासून दूर राहा, असा कानमंत्र मोदी यांनी दिला.
नोकरशाहीशी संघर्ष नको
लोकप्रतिनिधी म्हणून कायदे करण्याचे काम तुमचे आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नोकरशाहीची असते, त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, अशावेळी त्यांना सोबत घ्या, संघर्षाची भूमिका घेऊ नका.
लहान, लहान जाती-जमातींशी संवाद वाढवा, साधू-संतांचे वाढदिवस, त्यांचे कार्यक्रम यात आवर्जून हजेरी लावा, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस आणि रस्ते...
काँग्रेसच्या काळात, एका निवडणुकीत रस्ता बनविण्याचे आश्वासन द्यायचे, दुसऱ्या निवडणुकीत प्रस्ताव तयार करणे, चुना वगैरे टाकून लोकांना अमूक ठिकाणी रस्ता बनणार, असे सांगितले जायचे आणि तिसऱ्या निवडणुकीत रस्ता बनविला जायचा. आज आपण हजारो किलोमीटरचे रस्ते काही महिन्यांमध्ये तयार करतो, हे आपण खणखणीतपणे सांगावे, असे माेदी म्हणाले.