Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:23 IST2025-11-18T15:21:16+5:302025-11-18T15:23:10+5:30
Vegetable Price: यंदा ऐन थंडीच्या हंगामात भाजीपाल्याच्या दरांत २० ते ३० टक्के वाढ झाल्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
खलील गिरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: यंदा ऐन थंडीच्या हंगामात भाजीपाल्याच्या दरांत २० ते ३० टक्के वाढ झाल्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. राज्यात पावसाळा संपल्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले.
दादर येथील किरकोळ बाजारात गवार प्रतिकिलो १६० रुपये किलो, तर मटार, कारलीही १२० ते १३० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. टॉमेटोचे दर ८० रुपयांपर्यंत वाढले आहेत. कोथिंबीरची जुडीही ३० रुपयांवर गेली आहे. घेवड्याने शंभरी गाठली आहे. त्यामुळे नेमकी कोणती भाजी खरेदी करावी, हा प्रश्न गृहिणींना सतावू लागला आहे. शेपू, मेथी, पालक, कोथिंबीर या पालेभाज्यांची जुडी नेहमीच्या तुलनेत छोटी मिळत आहे. कोबी, फ्लॉवर यांचा आकारही लहान आहे, असे महिलांनी सांगितले.
दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील अंकुश साळेकर म्हणाले, साधारणतः नोव्हेंबरमध्ये भाजीपाला तुलनेने स्वस्त असतो. मात्र, यंदा अतिवृष्टीचा फटका बसल्याने भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाल्याने तो महाग झाला आहे. हे दर आणखी काही दिवस असेच राहतील व नंतर कमी होतील, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.
भाज्या दिवसेंदिवस महाग होत असल्याने आमचे बजेट कोलमडू लागले आहे. रोज जेवणात काय बनवायचे, असा प्रश्न उद्भवू लागला आहे. मंडईत येणारा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आहे की, रसायनांचा अतिवापर करून उत्पादित केलेला आहे, ही चिंता असताना आता महागाईमुळे चिंतेत अधिक वाढ झाली. शिल्पा महाडिक, गृहिणी
उत्पादन वाढल्यावर दर कमी
गेल्या काही दिवसांत झालेल्या हवामानातील बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी आवक घटली आहे. काही भाज्यांना जास्त उचल नसली तरी दर मात्र कमी होत नसल्याचे चित्र आहे. भाज्यांचे उत्पादन वाढल्यानंतरच दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.