‘बेस्ट’च्या प्रवासाला खासगीकरणाचे चाक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 02:45 AM2019-06-13T02:45:19+5:302019-06-13T02:45:45+5:30

कामगार संघटनेसह प्रशासनात सामंजस्य करार; दोन वर्षांत ताफ्यात १,२५० खासगी बस होणार दाखल

Private Chalk on 'Best' journey | ‘बेस्ट’च्या प्रवासाला खासगीकरणाचे चाक

‘बेस्ट’च्या प्रवासाला खासगीकरणाचे चाक

googlenewsNext

मुंबई : कामगार संघटनांचा विरोध मावळल्यामुळे बेस्ट उपक्रमात भाड्याने बस घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार तब्बल १२५० बसगाड्या पुढील दोन वर्षांमध्ये बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामध्ये ४५० वातानुकूलित आणि विनावातानुकूलित मिनी आणि मिडी बसचा समावेश आहे. मंगळवारी कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाल्यामुळे न्यायालयात प्रलंबित खासगी बसगाड्यांविरोधातील दावा मागे घेण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या तीन महिन्यांत पहिल्या टप्प्यात २५ टक्के बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील.

महापालिकेने सुचविलेल्या कृती आराखड्यानुससार बेस्ट उपक्रमाने भाड्याने बस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र कामगार संघटनांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतल्यामुळे या निर्णयावर स्थगिती आली होती. हे सर्व दावे मागे घेण्याची तयारी संघटनांनी दाखविली असून बुधवारी बेस्ट प्रशासन आणि कामगारांच्या कृती समितीमध्ये सामंजस्य करार झाला. त्यामुळे बेस्टमधील एकतृतीयांश बस खासगी कंपनीच्या असतील. बसचा ताफा व फेऱ्यांत वाढ झाल्यास बस थांब्यावरील प्रवाशांची प्रतीक्षा संपणार आहे. वाहतूककोंडीत अडकून पडणाºया बेस्ट गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिकेचा विचार सुरू आहे. तसेच पूल बंद केल्यामुळे दररोज होणारे सात लाखांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बस फेºया कमी होत असल्याने प्रवाशांना ३० ते ४५ मिनिटे बसची प्रतीक्षा करावी लागत होती. याचा फायदा रिक्षा, टॅक्सीला होऊन बेस्टच्या प्रवाशांमध्ये घट झाली होती. बसच्या फेºया वाढल्यास उत्पन्नही वाढेल, असा विश्वास बेस्ट प्रशासनाला आहे. मात्र भाड्याने घेतलेल्या बसगाड्यांमध्ये खासगी वाहनचालक असतील; तसेच गाड्यांच्या देखभालीची जबाबदारीही संबंधित कंपनीची असेल.

एकूण बसगाड्या- ३३३७
भंगारात काढतात - वार्षिक १५० गाड्या
वातानुकूलित मिनी बस - २००
विना वातानुकूलित मिनी बस - २००
मिडी बस - ५०

बचत - वातानुकूलित मिनी बस - ९ प्रति कि.मी., ३३ रुपये मिडी प्रति कि.मी.

अशा येणार बसगाड्या
२५ टक्के बसगाड्या भाड्याने घेण्यात येतील. यामध्ये १०० वातानुकूलित व विनावातानुकूलित मिनी बस, मिडी विनावातानुकूलित २५ बस या तीन महिन्यांत येतील. ५० टक्के बसगाड्या चौथ्या महिन्यात, उर्वरित २५ टक्के पाचव्या महिन्यात ताफ्यात दाखल होतील. सात वर्षांसाठी या बस भाड्याने घेण्यात येतील.

Web Title: Private Chalk on 'Best' journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.