गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा, अन्यथा ५० हजार दंड; महारेराचा बिल्डरांना सज्जड इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 06:15 IST2025-04-11T06:14:50+5:302025-04-11T06:15:23+5:30

क्यूआर कोडही प्रसिद्ध करणे बंधनकारक.

Print information about housing projects prominently in advertisements otherwise fine of Rs 50 thousand | गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा, अन्यथा ५० हजार दंड; महारेराचा बिल्डरांना सज्जड इशारा

गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा, अन्यथा ५० हजार दंड; महारेराचा बिल्डरांना सज्जड इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा वेबसाईटचा तपशील आणि क्यूआर कोड, संपर्क क्रमांक आणि प्रकल्प पत्ता ठळकपणे (मोठ्या फॉण्टमध्ये) छापणे बंधनकारक आहे. जाहिरातीच्या वरील भागात हा सर्व तपशील उजवीकडे रंगीत मजकुरात छापणे अत्यावश्यक आहे. याबाबतचे आदेश महारेराने बिल्डरांना गुरुवारी जारी केले आहेत. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डरांना ५० हजारांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. 

महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा वेबसाईट, क्यूआर कोड ठळकपणे छापणे नियमानुसार अत्यावश्यक आहे. परंतु अनेकदा सर्व तपशील ग्राहकांना शोधावा लागतो, इतक्या छोट्या अक्षरांमध्ये त्या जाहिरातीसोबत छापल्या जातात, असे निदर्शनास आले आहे. बिल्डरांची जाहिरात पारदर्शक असली पाहिजे. गृह प्रकल्पाचा सर्व तपशील सहजपणे घर खरेदीदारांना दिसावा आणि वाचता यावा, अशा पद्धतीने प्रसिद्ध करावा. शिवाय, घर खरेदीदारांना एका क्लिकवर प्रकल्पाची सर्व माहिती मिळावी म्हणून क्यूआर कोडही छापणे बंधनकारक आहे. मात्र अनेकदा क्यूआर कोड स्कॅन होत नसल्याच्या तक्रारी घर खरेदीदार करतात. त्यामुळे आता तर क्यूआर कोड स्कॅन झाला नाही तर त्याबाबतही बिल्डरांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे महारेराच्या आदेशात म्हटले आहे.  

माध्यम कोणतेही असो, नियम सारखाच 
वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिफलेटस, पोस्टर्स, व्हॉट्स अप ही समाजमाध्यमे आणि विविध माध्यमांमार्फत प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची जाहिरात बिल्डर करतात. कोणतेही माध्यम वापरून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये महारेरा क्रमांक, महारेरा वेबसाईट, क्यूआर कोड विहित आकारात छापणे बंधनकारक आहे.

निर्देशांचा भंग महागात पडेल...
बिल्डरांना दंड ठोठावल्यानंतर १० दिवसांत चुकीची दुरूस्ती करून महारेरा नोंदणी क्रमांक, वेबसाईटचा तपशील आणि क्यूआर कोड ठळकपणे छापला नाही तर निर्देशांचा सतत भंग केला जात असल्याचे गृहीत धरले जाईल आणि नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे महारेराने म्हटले आहे.

काही गोष्टींची खात्री केली पाहिजे
खरेदीदाराने व्यवहारापूर्वी काही गोष्टींची खात्री केली पाहिजे. यात गृहनिर्माण प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असायला हवा, हे अत्यावश्यक आहे. सूचनांनुसार काळजी घेतल्यास सुरक्षित गुंतवणूक करणे शक्य होईल, असा दावा महारेराने केला आहे. 

Web Title: Print information about housing projects prominently in advertisements otherwise fine of Rs 50 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.