मुहुर्ताला भाव घटले, खरेदीला 'सुवर्ण झळाळी'; सोने-चांदी खरेदीला राज्यभरात प्रचंड उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 12:37 AM2020-11-13T00:37:08+5:302020-11-13T07:04:32+5:30

साडेतीन मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसह सोने-चांदी खरेदीलाही मोठे महत्त्व दिले जाते.

Prices fall at the moment, 'gold sparkles' on purchases | मुहुर्ताला भाव घटले, खरेदीला 'सुवर्ण झळाळी'; सोने-चांदी खरेदीला राज्यभरात प्रचंड उत्साह

मुहुर्ताला भाव घटले, खरेदीला 'सुवर्ण झळाळी'; सोने-चांदी खरेदीला राज्यभरात प्रचंड उत्साह

Next

जळगाव/मुंबई : विजयादशमी पाठोपाठ धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरदेखील सोने-चांदीचे भाव कमी झाल्याने व लॉकडाऊनमध्ये दोन मुहूर्त हुकल्याने सध्या सोने-चांदी खरेदीसाठी प्रचंड उत्साह वाढला आहे. राज्यभरात सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला असून धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला खरेदी व मुहूर्त साधण्यासाठी बुकिंग करण्यासाठी सुवर्ण पेढ्या गजबजून गेल्या. 

साडेतीन मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसह सोने-चांदी खरेदीलाही मोठे महत्त्व दिले जाते. धनत्रयोदशीलाही सोने खरेदीला अनन्य महत्त्व असल्याने या दिवशी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. तो उत्साह यंदाही कायम तर आहेच, शिवाय कोरोनाचे सावट असले तरी खरेदी अधिक वाढली असल्याचे चित्र सुवर्णबाजारात आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्यानंतर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे सर्वच व्यवहारांसह सुवर्ण बाजारही ठप्प झाला. गेले तब्बल सात महिने सराफा बाजार ओस पडले होते. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहक येथे  फिरकत नव्हते.  लाॅकडाऊन दरम्यान लग्नसराई सोबतच गुढीपाडवा, अक्षयतृतीया हे सोने खरेदीचे मुहूर्त देखील ग्राहकांना साधता आले नाही. त्यानंतर मात्र नवरात्रोत्सवापासून सोने चांदी खरेदीला अधिक वेग आला. ऐन मुहूर्तावर १५ टक्क्यांनी भाव घसरले.  त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढली. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये सोने-चांदीचे भाव प्रचंड वाढून कधी नव्हे एवढा विक्रम सोन्या-चांदीने  नोंदविला. 

लॉकडाउनमुळे थांबलेली  खरेदी मुहूर्तावर वाढली

५८ हजार रुपये प्रति तोळ्याच्या पुढे पोहोचलेले सोन्याचे भाव  ५१ हजार रुपयांवर तर ७० हजार रुपयांवर पोहोचलेली चांदी ६२-६३ हजारावर आल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर कमी झालेले भाव मध्यंतरी काहीसे वाढले. मात्र आता धनत्रयोदशीच्या  मुहूर्तावर पुन्हा भाव कमी होऊन जवळपास १५ टक्के घसरण झालेल्या भावाचा फायदा ग्राहक घेत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.  यासोबतच लॉकडाऊनच्या काळात थांबलेली खरेदी आता धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर केली जात असल्याने यंदा इतर वर्षांच्या तुलनेत धनत्रयोदशीला खरेदीचे प्रमाण दीडपट झाले असल्याचे देखील सांगितले जात आहे. 

कलाकुसरीच्या आभुषणांना यंदा अधिक पसंती

केवळ जळगावातच नाही तर राज्यभरात असेच चित्र असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. सध्या कलाकुसरीच्या आभुषणांना अधिक पसंती असल्याने मनाजोगे दागिने भेटण्यासाठी ग्राहकांकडून बुकिंग करून ठेवली जात आहे. यामुळे गुरुवारी धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सुवर्णपेढ्या गजबजून गेल्या. शुक्रवारी या गर्दीमध्ये आणखी भर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला देखील सोने ५१ हजार २०० रुपये प्रति तोळा या भावावर स्थिर होते तर चांदीच्या भावात ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ६३ हजार ५०० रुपयांवर आली.  भाव कमी झाल्याने ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

Web Title: Prices fall at the moment, 'gold sparkles' on purchases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं