महापालिका जागावाटपात काँग्रेसवर ‘वंचित’चा दबाव? नगरपरिषदांप्रमाणे मुंबईतही समान जागांचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:25 IST2025-12-23T10:25:17+5:302025-12-23T10:25:56+5:30
नगरपरिषदांसाठी वंचितने काँग्रेसपुढे समसमान जागांचा प्रस्ताव ठेवला होता. जागावाटपाचे हेच ५०-५० सूत्र वंचित मुंबई महापालिकेसाठीही कायम ठेवू शकतो, असे म्हटले जाते.

महापालिका जागावाटपात काँग्रेसवर ‘वंचित’चा दबाव? नगरपरिषदांप्रमाणे मुंबईतही समान जागांचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नगरपरिषद निवडणुकीत चार नगराध्यक्ष आणि मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसशी युती करण्याबाबत वंचितचे पारडे जड असल्याचे म्हटले जाते. नगरपरिषदांसाठी वंचितने काँग्रेसपुढे समसमान जागांचा प्रस्ताव ठेवला होता. जागावाटपाचे हेच ५०-५० सूत्र वंचित मुंबई महापालिकेसाठीही कायम ठेवू शकतो, असे म्हटले जाते.
‘वंचित’ने युतीसाठी समसमान जागांचा प्रस्ताव ठेवल्यास काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या दोन्ही बाजूंकडील त्रिसदस्यीय समितीऐवजी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनाच चर्चेसाठी बसावे लागेल असे दिसते. मात्र, चर्चेत वंचित काँग्रेसवर दबाव टाकू शकतो, असे सांगितले जाते.
दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. परंतु, दोन्ही बाजूंनी अजून पत्ते उघड केलेले नाहीत.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी रविवारी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने प्राथमिक चर्चा केली, पण या बैठकीत ठोस काही घडलेले नाही. आंबेडकर सध्या औरंगाबादमध्ये आहेत. ते मुंबईत आल्यानंतर जागा वाटपाची दुसरी फेरी होईल, असे सांगण्यात आले.
नांदेडमध्ये आम्ही काँग्रेसकडे समसमान जागांचा प्रस्ताव ठेवला होता. सुरुवातीस काँग्रेसने अनुकूलता दर्शवली, मात्र ऐनवेळी निर्णय घेतला नाही. मुंबईतही आमचा समसमान जागांचा आग्रह असू शकतो, असे ‘वंचित’च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
काँग्रेसपुढे आव्हान काय?
नगरपरिषदांच्या निवडणुकीत यथातथा कामगिरी झाल्यामुळे महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसच्यादृष्टीनेही महत्त्वाची आहे. सध्या काँग्रेस कोणत्याही युती आणि आघाडीत नाही. स्वबळावर लढण्याची घोषणा पक्षाने केली आहे. मात्र, नगरपरिषद निकालानंतर बदललेले राजकीय चित्र पाहता काँग्रेसला काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील, असे जानकारांचे मत आहे.
वंचित किती जागा मागेल? : जागावाटप चर्चेच्या दुसऱ्या फेरीत वंचित किती जागांचा प्रस्ताव ठेवणार याकडे काँग्रेसचे लक्ष लागले आहे. वंचितचा प्रस्ताव फेटाळल्यास काँग्रेसला स्वबळावर मुंबई लढवावी लागेल. तसे झाले तर आधीच्या ३१ जागा कायम राखण्याबरोबरच आणखी काही जागा जिंकण्याचे आव्हान काँग्रेसला पेलावे लागेल.