Join us  

औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंनी केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 8:32 PM

गेल्या काही दिवासांपासून औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी विविध पक्षांनी उचलून धरली आहे.

मुंबई: गेल्या काही दिवासांपासून औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी विविध पक्षांनी उचलून धरली आहे. मनसेने देखील औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी करत शिवसेनेचा मुद्दा हायजॅक केला आहे. तसेच भाजपानेही औरंगाबादच्या नामांतरला पाठिंबा दिला आहे. मात्र भाजपाचा मित्रपक्षाने औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे असे मत भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. मात्र औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यास रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे.

रामदास आठवले म्हणाले की, कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये असं माझ्या पक्षाला वाटते. त्यामुळे औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध आहे. परंतु जर राज्य शासनाने नाव बदलण्याचे ठरवले तर नावात बदल केला जाऊ शकतो असे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल त्यांनी सांगितले की, रिपाइंचा लवकरच मेळावा होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत रिपाइं पूर्ण ताकदीने भाजपसोबत राहून शिवसेनेला पराभूत करणार आहे. मुंबईचा २०२२ चा महापौर भाजपाचाच असेल, असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :रामदास आठवलेमनसेभाजपाशिवसेनाचंद्रकांत पाटीलमहाराष्ट्रऔरंगाबाद