Preparing to list Mumbai's premises for nightlife; Will Aditya Thackeray's dream come true? | नाइटलाइफसाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी; आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार?

नाइटलाइफसाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी; आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार?

ठळक मुद्देनाइटलाइफ नाही, ही तर सामान्यांसाठी ‘मुंबई २४ तास’ ही संकल्पनासामान्य मुंबईकरांना डोळ्यासमोर ठेवून चौकट आखायला हवीकोणाचा बालहट्ट म्हणून निर्णय घेतल्यास मुंबईकरांनाच त्याचा फटका

मुंबई : नाइटलाइफ अंतर्गत मुंबईतील दुकाने, मॉल्स, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे अनिवासी ठिकाणांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यानुसार त्या परिसराची पाहणी करून पोलिसांच्या मदतीने अतिरिक्त सुरक्षा ठेवण्याबाबत निर्णय होणार आहे.

मुंबई रात्रंदिवस जागी असते. त्यामुळे येथील व्यवहार २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. २६ जानेवारीपासून मुंबईतील अनिवासी क्षेत्रांमधील मॉल्स, दुकाने, रेस्टॉरंट २४ तास सुरू राहातील. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी पोलिसांसह पालिकेलाही घ्यावी लागेल. यासाठी २४ तास सुरू ठेवण्यात येणारी दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट आदी परिसराचा आढावा महापालिका घेणार आहे.

अनिवासी क्षेत्रापासून प्रयोग सुरू

सुरुवातीला हा प्रयोग अनिवासी क्षेत्रे म्हणजेच काळाघोडा, वांद्रे-कुर्ला संकुल, नरिमन पॉइंट अशा ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या परिसरात नाइटलाइफच्या प्रयोगाच्या यश-अपयशाचा आढावा नियमित घेण्यात येणार असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

पर्यटनवाढीसाठी हा निर्णय घेतला जात असल्याचा दावा केला जात आहे. या निर्णयासाठी जी घाई सुरू आहे, जो हट्ट केला जात आहे तो पाहता संपूर्ण प्रकल्पाचा कितपत अभ्यास झाला असेल याबाबत साशंकताच आहे. आज मुंबई महापालिकेत दशकानुदशके शिवसेनेची सत्ता आहे. नागरिकांना आजवर काय सुविधा मिळाल्या, जगातील अनेक महानगरांमध्ये नाइटलाइफ सुरू असल्याची बतावणी केली जात आहे. परंतु, या जागतिक महानगरांमध्ये ज्या नागरी सुविधा आहेत त्या तुम्ही पुरवल्या का, याचे उत्तर कोण देणार? प्रायोगिक तत्त्वावर नाइटलाइफची अंमलबजावणी करताना या निर्णयाचा सर्व घटकांवर जो परिणाम होणार आहे त्याचा अभ्यास व्हायला हवा. सामान्य मुंबईकरांना डोळ्यासमोर ठेवून चौकट आखायला हवी.कोणाचा बालहट्ट म्हणून निर्णय घेतल्यास मुंबईकरांनाच त्याचा फटका बसणार आहे. - अखिल चित्रे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना


नाइटलाइफ नाही, ही तर सामान्यांसाठी ‘मुंबई २४ तास’ ही संकल्पना

मुंबईतील रात्रजीवन हा आता सगळ्यांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. त्यावरून काही वादही होत आहेत. मुंबईतील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मात्र याबाबत सावधगिरीचा सूर लावला आहे. पर्यटनवाढीसाठी स्वागतार्ह निर्णय असल्याचे प्रांजळपणे कबूल करतानाच त्यामुळे निर्माण होणाºया नव्या प्रश्नांचाही विचार व्हायला हवा, अशी भूमिका मांडली जात आहे. रात्रजीवनाचे स्वागत असले तरी मूळ प्रश्नांपासून दूर जाता येणार नाही, असा मुद्दाही यानिमित्ताने या मंडळींनी मांडला. त्यांची ही प्रातिनिधिक मते...

नाइटलाइफमुळे रोजगार वाढेल, पर्यटक मोठ्या प्रमाणात मुंबईकडे आकर्षित होतील, यात कोणतीच शंका नाही. याशिवाय, सामान्य नागरिकाला या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. आज मुंबईतील नाइटलाइफ हे केवळ फाइव्ह स्टार हॉटेलपुरते मर्यादित आहे. अनेकदा सामान्य माणूस काही महत्त्वाच्या कामासाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर असतो. त्याला चहा-कॉफी घ्यायची असेल, भूक लागली म्हणून काही खायचे असेल तर पर्यायच नाही. वैध आणि सुरक्षित पर्याय असायला हवा. ‘मुंबई २४ तास’मुळे हा पर्याय मिळणार आहे. बीकेसी किंवा कमला मिल कंपाउंडसारख्या बंदिस्त क्षेत्रात या सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही. त्याच्या खासगी आयुष्याला, शांततेला बाधा येणार नाही. पुढच्या टप्प्यात रेल्वे स्टेशन, विमानतळांवर ही संकल्पना राबविण्यात येईल. सामान्य नागरिकांना याचा लाभच होईल. ‘मुंबई २४ तास’मुळे प्रवासी, पर्यटकांचे मुंबईत वास्तव्य वाढेल. आपसूकच व्यवसाय, रोजगार वाढेल. शासनाच्या महसुलातही वाढ होईल. - जिशान सिद्दिकी, आमदार, काँग्रेस

नागरिकांचा माणूस म्हणून जगण्याचा किमान अधिकार तरी आपण देणार आहोत का? आजघडीला पोलीस सरासरी बारा तास काम करत आहेत. महत्त्वाच्या प्रसंगात ते २४ - २४ तास ड्युटीवर राहतात. नाइटलाइफ सुरू झाल्यावर त्यांच्यावर बोजा वाढणार हे उघड आहे. नाइटलाइफमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. स्वैराचाराची नवीनच डोकेदुखी त्यामुळे सुरू होण्याची भीती आहेच. शिवाय, प्रशासनातील कामगार किंवा अन्य विभाग आहेत. त्यातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी दिवस पाळीची कामे करतात. नाइटलाइफ सुरू झाल्यावर त्यांना रात्र पाळी लावणार की नवीन भरती करणार, याचे उत्तर द्यायला हवे. मुंबईत बीकेसीचा अपवाद वगळता कुठेच शंभर टक्के अनिवासी भाग नाही. कमी असले तरी ३० ते ४० टक्के रहिवासी सर्वत्र आहेत. या नागरिकांच्या अधिकारांचे काय? ही मंडळी दिवसभर नोकरी, व्यवसाय करून घरी येतात. या थकल्या जीवांना आपल्याच घरात शांततेत, सुखात राहण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. हे खासगी आयुष्य हिरावले जाण्याची शक्यता आहे. पर्यटनाच्या नावाखाली किमान नागरी अधिकाराची पायमल्ली तर होत नाही ना, याचा सारासार विचार करण्याची वेळ आली आहे. - अमोल जाधव, प्रदेश सरचिटणीस, भाजयुमो

Web Title: Preparing to list Mumbai's premises for nightlife; Will Aditya Thackeray's dream come true?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.