जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 06:08 IST2025-06-03T06:04:59+5:302025-06-03T06:08:17+5:30

मुंबईतील कोविडचाही घेतला आढावा

Prepare an emergency plan for overcrowded metro stations; Ashish Shelar directs MMRDA | जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईत मुंबईत मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणांची सुरक्षा तपासणी करावी. आपत्कालीन परिस्थितीत अंधेरी, घाटकोपरसारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशनवरून प्रवाशांना बाहेर काढणे, अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे, यांसाठी आपत्कालीन आराखडा तयार करावा. त्यामध्ये महापालिका आणि बेस्ट उपक्रमालाही समाविष्ट करून घ्यावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी दिले.

वांद्रे येथील एमएमआरडीए कार्यालयात मंत्री शेलार यांनी मुंबईतील मान्सूनपूर्व कामांबाबत आढावा बैठक घेतली. एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल, आस्तिककुमार पांडे, महा मेट्रोच्या संचालिका रुबल अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

एमएमआरडीए व महामेट्रो प्राधिकरणांनी मुंबई महापालिकेशी सतत संपर्क व समन्वय ठेवून एक टीम म्हणून एकत्रितपणे कामे करावे. तसेच, भूमिगत मेट्रोमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मंत्री शेलार यांनी दिले.

एमएमआरडीए व महामेट्रो या दोन्ही प्राधिकरणांनी स्वतंत्र आपत्कालीन कंट्रोल रूम तयार केला आहे. आपत्कालीन मदत सेवेसाठी १९ ठिकाणी रुग्णवाहिका, तसेच टीम तैनात केल्या आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवणारी यंत्रणा प्रत्येक प्रकल्पासाठी उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १०७ ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप बसविण्यात आले आहेत. पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीमध्ये मदतीसाठी या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत, अशी माहिती दोन्ही प्राधिकरणांकडून या बैठकीत देण्यात आली.

मुंबईतील कोविडचाही घेतला आढावा

प्राधिकरणांच्या बैठकीनंतर मंत्री शेलार यांनी आरोग्य खाते, महापालिका आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुंबईत कोविडचे रुग्ण दाखल होत असले, तरी घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब व गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या नागरिकांनी मास्क वापरावे. पुन्हा लसीकरण करण्याबाबत, तसेच कोविडच्या परिस्थितीबाबत केंद्रीय यंत्रणांसोबत बैठका सुरू आहेत. केंद्राच्या सूचनांनुसार पालिका व राज्याची आरोग्य यंत्रणा काम करत असल्याचे या बैठकीत स्पष्ट केले.

Web Title: Prepare an emergency plan for overcrowded metro stations; Ashish Shelar directs MMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.