"भाकऱ्या, तुकड्या, बाजऱ्या-बेसन लेके जाएंगे"; जरांगे पाटलांकडून मुंबई दौऱ्याची अशी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 02:53 PM2024-01-18T14:53:11+5:302024-01-18T14:58:27+5:30

गेल्या वर्षभरापासून मराठ्यांनी वाट पाहिली. आमच्या अडीशे तीनशे बांधवांनी आत्महत्या केलीय.

Preparations for Mumbai tour from Manoj Jarange Patil for maratha reservation from jalana to mumbai | "भाकऱ्या, तुकड्या, बाजऱ्या-बेसन लेके जाएंगे"; जरांगे पाटलांकडून मुंबई दौऱ्याची अशी तयारी

"भाकऱ्या, तुकड्या, बाजऱ्या-बेसन लेके जाएंगे"; जरांगे पाटलांकडून मुंबई दौऱ्याची अशी तयारी

मराठाआरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा समाजाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टीमेट आता संपत आला आहे. मात्र, अद्यापही सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे, जरांगे यांच्या घोषणेनुसार २० जानेवारी रोजी ते मुंबईला जाणार आहेत. त्यांच्या या मुंबई दौऱ्याची राज्यभर चर्चा असून हा नेमका दौरा कसा असणार आहे, या दौऱ्याचा मार्ग कसा असेल, यासंदर्भात जरांगे यांनी माहिती दिली. जरांगे यांनी त्यांच्या हटके हिंदी स्टाईलने मुंबईला जाताना काय काय सोबत घेणार हेही सांगितलं. 

गेल्या वर्षभरापासून मराठ्यांनी वाट पाहिली. आमच्या अडीशे तीनशे बांधवांनी आत्महत्या केलीय. आमच्या आई बहिणीच्या कपाळावरील कुंकू पुसलंय. आमच्या माताभगिनींची डोकी फुटलीत. पोरं अडीच महिने रुग्णालयात होती. सरकारनं भानावर यावं. मागच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला गोडी गुलाबीने यावर तोडगा काढावा लागेल. आडमुठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊ देणार नाही. आता मराठे संतापलेत. ५४ लाख लोकांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या. सरकारनं माझ्यावर ट्रॅप रचलाय, मी त्याला भीत नाही, असं जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला ठणकावलं. तसेच, मराठा आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळालं तरीही जाणार, असेही ते म्हणाले. 

असा असेल मार्ग

ट्रक, टेम्पो, जीपा घेऊन आम्ही सर्वजण त्यात बसून मुंबईला जाणार आहोत. त्यासोबतच, भाकऱ्या-तुकड्या, बाजऱ्या, बेसन लेके मुंबई जाएंगे, असे आपल्या हटकेस्टाईल हिंदीत मनोज जरांगेंनी सांगितले. भारतात पहिल्यांदाच सर्व मराठे एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत येणार आहेत. आम्ही ४-५ दिवस मुंबईत राहणार आहोत. अंतरवाली, गेवराई, पाटळशिंगे, पाथर्डी, नगर, पुणे, शिवाजीनगर आणि एक्सप्रेस हायवे या मार्गावरुन आम्ही चालत निघणार आहोत. सरकार आमची दिशाभूल करत आहे, केवळ देतो.. देतो.. असे म्हणत आहे. त्यामुळे, आता मुंबईला जाऊन आम्हीच आरक्षण घेऊन येणार आहोत, असेही जरांगे यांनी म्हटलं आहे. 

मराठा समाजाला आवाहन

जालनातील अंतरवाली सराटी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज जो मुंबईला येणार आहे त्यांना २० तारखेपासून अंतरवाली सराटी येथून निघायचे. जे येणार नाहीत त्यांनी सर्वांना वाटेला लावण्यासाठी यावे. सगळ्या मराठ्यांनी बाहेर पडावे. सरकार आपल्याला येड्यात काढायला निघालंय. कुणीही उद्रेक, जाळपोळ करू नये. जर कुणी करणार असेल तो आमचा माणूस नाही. घरी कुठल्याही मराठ्यांनी थांबू नये. ताकदीने रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे असं त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Preparations for Mumbai tour from Manoj Jarange Patil for maratha reservation from jalana to mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.