आजी-माजी शासकीय अधिकारी निवडणूक लढण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 06:27 AM2019-09-01T06:27:36+5:302019-09-01T06:28:00+5:30

मंत्रालयही लागले कामाला । अनेकांचे राजीनामे तयार

 Pre-ex-government officials preparing to contest election | आजी-माजी शासकीय अधिकारी निवडणूक लढण्याच्या तयारीत

आजी-माजी शासकीय अधिकारी निवडणूक लढण्याच्या तयारीत

Next

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच अनेक इच्छिुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून राजकीय कार्यकर्त्यांसोबत आता आजी-माजी शासकीय अधिकारी आणि कर्मचारीही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस- राष्टÑवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीचे जागा वाटप निश्चित झाल्यानंतर आणखी काही अधिकारी नोकरी सोडून निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघातून भाजपतर्फे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त साहेबराव पाटील हे इच्छुक आहेत.

पैठणमधून कांचन चाटे इच्छुक
निवृत्त पोलीस उपअधीक्षक डॉ. कांचन चाटे हे पैठण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. ते निवृत्त झाल्यापासून भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मुंबईतून सेवानिवृत्त झालेले जिल्हा न्यायाधीश बी. टी. कांबळे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. तर माजी न्यायाधीश त्र्यंबक जाधव, रा. म्हारोळा ता. पैठण. हे शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविणार आहेत. माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंडीत किल्लारीकर ( कांबळे) हे यांनीही वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मागितली आहे. कन्नडमधून निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. जे. जाधव ‘वंचित’ आघाडीकडून इच्छुक आहेत.

तिघांचे राजीनामे, दोघांची तयारी...
१ नाशिक जिल्ह्यात अपर महसूल आयुक्त टी. के. बागुल यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीकडून तयारी चालविली आहे. देवळाली मतदारसंघातून तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांचे नाव घेतले जात आहे.
२माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे चुलत बंधू दिलीप भामरे यांनाही विधानसभेचे वेध लागले असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील उपविभागीय अभियंतापदाचा राजीनामा दिला आहे. तर कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून एन. डी. गावित यांनी तयारी चालविली आहे. गावित हे नाशिक जिल्हा परिषदेत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.
३दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी नाशिकच्या भाजपच्या महापौर रंजना भानसी यांचे बंधू दिलीप राऊत यांनीही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंतापदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. नांदगाव मतदारसंघातून सहकार व पणन विभागाचे सहआयुक्त बाजीराव शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील आजी-माजी
गोंदिया जिल्ह्यात पाच आजी-माजी अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. अजुर्नी मोरगाव मतदारसंघातून सेवानिवृत्त कृषी अधीक्षक मनोहर चंद्रिकापुरे (राष्टÑवादी काँगे्रस ), शिक्षक असलेले जगदीश जगणित (भाजप), सेवानिवृत्त मत्स्य अधिकारी मोतीलाल वालदे (भाजप), सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता व्यकंट चौधरी (भाजप), तर सेवानिवृत्त अभियंता आनंदराव जांभुळकर हे काँग्रेसकडून लढण्याच्या तयारीत आहेत.
आमगाव-देवरी मतदारसंघातून सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त डॉ.नामदेव किरसान (काँग्रेस), तर सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी सुभाष रामरामे (अपक्ष) यांनीही तयारी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या राखीव मतदारसंघातून निवृत्ती उपमुख्यकार्यकारी अधिकारी लहू कानडे व निवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हे इच्छूक आहेत. मात्र त्यांनी कोणत्या पक्षाकडून लढणार हे अद्याप जाहीर केलेले नाही.

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आजी-माजी अधिकारी-कर्मचारी निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून दुग्ध विकास आयुक्त मुंबई नरेंद्र पोयाम हे काँग्रेसकडून इच्छूक आहेत. तिथे तिकीट मिळाले नाही तर भाजपकडून आर्णी मतदारसंघातून लढण्याची तयारी आहे. आर्णीतूनच सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दत्ता मडावी (भाजप), महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी चंद्रपूरचे मुख्य अभियंता मनोहर मेश्राम (काँग्रेस), वैद्यकीय अधिकारी ठाणे जिल्हा डॉ. नीलेश परचाके (काँग्रेस), सेवानिवृत्त अभियंता डॉ. प्रमोद धुर्वे, सेवानिवृत्त अभियंता (भाजप), सेवानिवृत्त शिक्षक भाऊराव मरापे (काँग्रेस) हेही इच्छुक आहेत.
राळेगाव विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून गुलाब पंधरे, सेवानिवृत्त सहायक फौजदार, यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून पी.बी. आडे, सेवानिवृत्त दुग्ध उपायुक्त (भाजप), राळेगाव विधानसभा मतदारसंघातून शिक्षक मनोहर मेश्राम (काँग्रेस), तर उमरखेड विधानसभा मतदारसंघातून डॉ. संदीप गायकवाड, वैद्यकीय अधिकारी (काँग्रेस) यांनीही फिल्डिंग लावली आहे.

एन्काउंटर फेम प्रदीप शर्मा
मुंबई पोलीस दलात एन्काउंटर फेम अशी ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा नालासोपारा किंवा अंधेरीतून शिवसेनेकडून लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. ठाणे शहर मतदार संघातून निवृत्त पोलीस निरीक्षक रविन्द्र आंग्रे तर निवृत्त पोलिस निरीक्षक रवींद्र तायडे शिवसेनेतून मुंब्रा मतदार संघातून इच्छुक आहेत. शहापूर या अनुसुचित जमातीसाठी राखीव मतदारसंघातून विजय शिंदे (प्राध्यापक -ज्युनियर कॉलेज खाडे विद्यालय,शहापूर), ज्ञानेश्वर तळपाडे (माध्यमिक शिक्षक ग. वि. खाडे विद्यालय,शहापूर) आणि चंद्रकांत जाधव (निवृत्त कर्मचारी एसटी महामंडळ) हे तिघेही शिवसेनेकडून इच्छुक आहेत. माजी सनदी अधिकारी (माजी कोकण आयुक्त ) विजय नाहटा हे बेलापूर मतदारसंघातून शिवसेनेकडून इच्छुक आहेत. २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. निसटता पराभव झाला होता.

नांदेड जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी
च्माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपाकडून (लोहा) उमेदवारी मागितली आहे़ तर हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या नावाचीही मुखेडसाठी भाजपाकडून चर्चा आहे़ लोहा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे सेवानिवृत्त सनदी अधिकारी एकनाथ मोरे प्रयत्नशील आहेत़
च् किनवट विधानसभा मतदारसंघातून निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी यादवराव जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वेच्छा निवृत्ती घेतलेले उपायुक्त धरमसिंग राठोड हे भाजपाकडून इच्छुक आहेत़ तर मुंबई महानगरपालिकेतून नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले मोहन फत्तुसिंग राठोड हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत़
च्हदगाव विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून समृद्धी महामार्गाचे संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह सेवानिवृत्त पोलिस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय वाळकेही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत़ याच मतदारसंघातून वैद्यकीय अधिकारी डॉ़बळीराम भुरके यांच्यासाठीही कार्यकर्त्यांनी वंचितकडे आग्रह धरला आहे़

Web Title:  Pre-ex-government officials preparing to contest election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.