BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 09:12 IST2025-08-20T08:53:45+5:302025-08-20T09:12:05+5:30
Mumbai BEST Election Results 2025:बेस्टच्या कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकही जागा न जिंकल्याने प्रसाद लाड यांनी टीका केली.

BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
Prasad Lad on BEST Election Results: बेस्टच्या कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. मात्र या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला एकही जागा मिळालेले नाही. २१ जागांच्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी १९ तर राज ठाकरे यांनी दोन उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. तर शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक १४ उमेदवार निवडून आले आहेत. तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. गेल्या नऊ वर्षापासून उद्धव ठाकरे यांची बेस्ट पतपेढीवर सत्ता होती, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र आल्याने मोठी चर्चा सुरु झाली होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधू पराभूत झाले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा परिणाम होणार नाही असं प्रत्युत्तर महायुतीकडून दिलं जात होतं. आता ते प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून आलं आहे. हा पराभव ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा अखेर लागला असून ठाकरे बंधूंचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. मंगळवारी रात्री उशीरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही. तर शशांकराव यांच्या पॅनलने १४ जागा जिंकल्या आहेत. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलने ७ जागा जिंकल्या आहेत. यावरुनच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे.
प्रसाद लाड यांनी सोशल मिडिया पोस्टवरुन ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. जागा दाखवली म्हणत प्रसाद लाड यांनी ही पोस्ट केली आहे. "बेस्ट इलेक्शन मध्ये ठाकरे ब्रँड २१ समोर ००० ००/२१ म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत," असं लाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जागा दाखवली…. pic.twitter.com/waPJMkMuL9
— Prasad Lad (@PrasadLadInd) August 19, 2025
दरम्यान, गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता होती. मात्र, आता शशांक राव यांच्या पॅनेलची सत्ता आली आहे. बेस्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पंचवार्षिक निवडणुकीत शशांक राव पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत.