उमेदवारी मिळविण्यासाठीच मेहतांची प्रतिष्ठा पणाला, भाजपाच्या बालेकिल्यात अंतर्गत आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 04:32 AM2019-08-15T04:32:04+5:302019-08-15T04:32:33+5:30

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भाजपचा बालेकिल्ला आहे.

Prakash Mehta's reputation for getting candidacy, BJP's internal challenge | उमेदवारी मिळविण्यासाठीच मेहतांची प्रतिष्ठा पणाला, भाजपाच्या बालेकिल्यात अंतर्गत आव्हान

उमेदवारी मिळविण्यासाठीच मेहतांची प्रतिष्ठा पणाला, भाजपाच्या बालेकिल्यात अंतर्गत आव्हान

Next

- जमीर काझी
मुंबई : घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भाजपचा बालेकिल्ला आहे. माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी येथून सलग सहा वेळा विजयाची पताका फडकविली आहे. अर्थात, यंदा त्यांच्यासमोर उमेदवारी कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांना डच्चू देत, त्यांच्या कार्यपद्धतीबाबतची नाराजी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केली. त्यामुळे त्यांना स्वत:ला किंवा मुलगा हर्ष मेहता याला तिकीट मिळवून देण्यासाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लागावी लागेल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. या ठिकाणी विरोधकांचे अस्तित्व केवळ नावालाच राहणार आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा एक भाग असलेल्या या मतदारसंघात गुजराती भाषिक मतदारांचे वर्चस्व आहे. या ठिकाणी रस्ते, वाहतुकीची कोंडी या समस्या अनेक वर्षांपासून कायम असल्या, तरी या समाजाने तीन दशकांपासून भाजपच्या झोळीत भरभरून मतदान केले आहे. १९९० पासून प्रकाश मेहता यांना सातत्याने उमेदवारी दिली आहे. युती सरकारच्या दोन्ही कालखंडात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. तुलनेत यावेळची कारकिर्द वादग्रस्त ठरली. गृहनिर्माणसारखे महत्त्वाचे खाते आणि ज्येष्ठ मंत्र्यांत समावेश असल्याने प्रतिमा उजळविण्यास मोठी संधी होती. मात्र, एसआरए प्रकल्प, इमारतीचा पुनर्विकास, नियमबाह्य दिली जाणारी परवानगी आणि त्यातील टक्केवारी याबाबत सातत्याने त्यांच्यावर आरोप होत राहिले. त्यामुळे मेहता नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहिले. तीन, चार वर्षांपूर्वी पालकमंत्री म्हणून महापुराची पाहणी करण्यासाठी गेले असताना, सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नव्हता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मेहता यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र, त्यांच्या स्थानावर कसलाही परिणाम झाला नाही. त्यानंतर, गेल्या दोन तीन वर्षांत एसआरए, म्हाडातील प्रकरणावरून आरोपाची सरबत्ती होत राहिली. एका प्रकरणात अतिक्रमणाची कारवाई टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा प्रयत्न केल्याने उच्च न्यायालयाने फैलावर घेतले. तर अन्य एका वादग्रस्त प्रकरणात त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने प्रकरणाला मंजुरी देत असल्याचे ‘रिमार्क’ मारल्याने मोठा गदारोळ उडाला. गेल्या वर्षी अधिवेशनात विरोधकांनी हा विषय लावून धरल्याने या प्रकरणाची चौकशी लोकायुक्ताकडून करण्यात आली आहे. त्याचा अहवाल अद्याप उघड करण्यात आला नसला, तरी त्यामध्ये मेहतावर ताशेरे ओढल्याची शक्यता आहे.
त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये डच्चू दिल्याचे सांगितले जाते. मेहता यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली असली, तरी त्याचा तीळमात्र फायदा मतदार संघातील विरोधकांना घेता आलेला नाही. २०१४ मध्ये कॉँग्रेसचे उमेदवार असलेल्या प्रवीण छेडा यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मेहता यांच्यावरील मुख्यमंत्र्यांची नाराजीमुळे छेडा उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत आहेत. त्याशिवाय पराग शाह हेही प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जाते. मेहता यांनी स्वत:ला तिकीट न मिळाल्यास पुत्र हर्ष मेहता याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. त्यालाही विरोध झाल्यास पक्षातील विरोधकांना मात देण्यासाठी ते एखाद्या मराठी नावे पुढे करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून तब्बल ९० हजारांवर मताची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित असले, तरी भाजपसाठी ही हक्काची जागा आहे.
(उद्याच्या अंकात वाचा
- घाटकोपर पश्चिम)

Web Title: Prakash Mehta's reputation for getting candidacy, BJP's internal challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.