पुरोगामी महाराष्ट्रात दिसतोय जातीय समीकरणांचाच बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 08:11 AM2019-03-31T08:11:49+5:302019-03-31T08:12:38+5:30

जातींच्या राजकारणाला ऊत । उमेदवारांच्या पोटजातींचाही शोध

Pragogami dominated the caste equations seen in Maharashtra | पुरोगामी महाराष्ट्रात दिसतोय जातीय समीकरणांचाच बोलबाला

पुरोगामी महाराष्ट्रात दिसतोय जातीय समीकरणांचाच बोलबाला

Next

यदु जोशी 

मुंबई : फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र चार वर्षे दहा महिने पुरोगामी असतो आणि निवडणुकीच्या शेवटच्या दोन महिन्यांत तो राजकीयदृष्ट्या जातीय समीकरणांमध्ये कसा गुरफटतो याची प्रचिती सध्याच्या लोकसभा निवडणुकीवरून पुन्हा एकदा येत आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जातीची गणिते मांडून त्या आधारावर जय-पराजयाचे अंदाज बांधले जात आहेत.

जिथे वेगवेगळ्या जातींचे दोन प्रमुख उमेदवार आहेत, तिथे दोन जातींमध्ये राजकारण होत आहे. जिथे दोन प्रमुख उमेदवार एकाच जातीचे आहेत तिथे मग त्यांच्या पोटजाती शोधून राजकारण सुरू झाले आहे. याबाबत यवतमाळ आणि भंडारा-गोंदिया मतदार संघाचे उदाहरण देता येईल. औरंगाबाद, परभणीमध्ये, ‘खान पाहिजे की बाण पाहिजे’ हा हुकमी एक्का बाहेर काढला जात आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात लढत देत असलेले काँग्रेसचे नाना पटोले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने डीएमके पॅटर्न पुढे केला जात आहे. डीएमके म्हणजे दलित मुस्लिम आणि कुणबी. या तिन्ही समाजांचे नागपुरात फार मोठे मतदान आहे. गडकरी यांच्यासमोर या पॅटर्नच्या आधारे आव्हान उभे राहील, असा तर्क दिला जात आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर मतदारसंघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शिवसेनेतून आलेले राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे असा सामना होत आहे. कोल्हे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देताच आढळराव पाटील यांनी त्यांची जात काढली होती.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या भूमीत वर्धेत सध्या राजकारण दोन जातींमध्ये विभागले गेले आहे. काँग्रेसच्या चारुलता राव टोकस कुणबी समाजाच्या तर विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार रामदास तडस हे तेली समाजाचे आहेत. मतदारसंघांमध्ये तुल्यबळ असलेल्या या दोन जाती निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आहेत. ‘आम्ही आपल्या जातीच्या उमेदवारासोबतच राहू’ अशा शपथा मंदिरांमध्ये दिल्या जात आहेत. रामटेक या अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघात अगरबत्ती विरुद्ध मेणबत्ती असा वाद उकरून मतांचे ध्रुवीकरण केले जात आहे. अकोल्यामध्ये मराठा, दलित आणि मुस्लिम अशा तीन प्रमुख उमेदवारांच्या जातींभोवती राजकारण फिरत आहे.
हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात मराठा कार्ड वापरणे ही बाब आता नवीन राहिलेली नाही. ‘वाजवा टाळी पळवा माळी’ या नाशिकमधील जुन्याच घोषणेचा प्रत्यय माळी विरुद्ध मराठा उमेदवारांच्या संघर्षात पुन्हा एकदा येत आहे. बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्या लढतीला वंजारी विरुद्ध मराठा असा रंग दिला जात आहे. पुणे मतदारसंघात गिरीश बापट यांना भाजपने उमेदवारी देताच तेथील राजकारणाला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची फोडणी दिली जात आहे.

1980 मध्ये भाजपची स्थापना झाली तेव्हाचे संघटन मंत्री वसंतराव भागवत यांनी माधव पॅटर्नची कल्पना मांडली. काँग्रेसच्या मराठाधार्जिण्या राजकारणामुळे वंचित राहिलेल्यांना जोडणारा तो पॅटर्न होता. त्याचे नेतृत्व गोपीनाथ मुंडे या तरुण नेत्याने केले. माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी या तीन समाजांना जोडणारा पॅटर्न. भाजपला बहुजन आधार मिळवून देण्याचे काम त्यातूनच सुरू झाले.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी साधारणपणे वीस-बावीस वर्षांपूर्वी भारिप-बहुजन महासंघाचा सोशल इंजिनीअरिंग करणारा अकोला पॅटर्न आणला. त्याला अकोला जिल्ह्यात मोठे यश मिळाले. जिल्हा परिषद पंचायत समित्या त्यांनी जिंकल्या. तसेच काही आमदार देखील निवडून आणले. यावेळी आंबेडकर यांनी त्यांच्या बहुजन वंचित आघाडीची यादी उमेदवारांच्या जातींसह प्रसिद्ध केली.

‘मामुली' पॅटर्न
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर विधानसभा मतदारसंघात 'मामुली' पॅटर्न गाजला. खरे तर तो 'मामुलीरे' (मारवाडी, मुस्लिम, लिंगायत, रेड्डी) असा पॅटर्न होता. पुढे तो मामुली नावानेच सुपरिचित झाला. विलासरावांच्या विरोधात मराठेतर मते एकत्र आणण्यासाठी तेव्हाचे त्यांचे विरोधक शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मामुलीचा वापर केला व कव्हेकर जिंकले. पुढे काही निवडणुकांत मामुली पॅटर्न वापरला गेला.

Web Title: Pragogami dominated the caste equations seen in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.