Join us

प्रभादेवीत ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने: पोलिसांमुळे मोठा वाद टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:40 IST

केवळ वाद घालण्यासाठी ते तिथे आले होते. काम होत असेल तर वाद घालायचं एवढेच काम त्यांच्याकडे आहे. लोक त्यांच्यासोबत नाहीत, मतदान होणार नाही हे कळाल्यामुळे वाद घालायचा प्रयत्न होतोय असा आरोप समाधान सरवणकरांनी केला.

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. त्यात कुणी उद्धव ठाकरेंचं समर्थन केले तर कुणी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले. शिंदेंच्या बंडखोरीत शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादर भागातील आमदार सदा सरवणकर हेदेखील सहभागी झाले. त्यामुळे या परिसरात ठाकरे-शिंदे गटात कायम तणावाचं वातावरण राहिलेले आहे. गणेशोत्सवानंतर आता पुन्हा एकदा प्रभादेवी भागात विकासकामांच्या उद्धाटनावरून ठाकरे-शिंदे गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा वाद टळला. 

प्रभाग क्रमांक १९४ मध्ये रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू होताना त्याठिकाणी शिंदे-ठाकरे आमनेसामने आले. तेव्हा दोन्ही बाजूने घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना दूर नेले. या घटनेवरून स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर आणि आमदार अजय चौधरी यांच्यातील वाद उफाळून आला आहे. या घटनेवर समाधान सरवणकर म्हणाले की, माझ्याविरोधात घोषणा दिल्या नाही. जे काही काम सुरू होते ते थांबवण्याचं काहींनी काम केले. ते मुंबई महापालिकेचं काम होते. दैनिक सामना मार्गावरील रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम होतं. माझ्या प्रभागातील ही कामे मंजूर झाली त्याबाबत पालिका अधिकाऱ्यांनी मला कॉल केला होता. आपण जी कामे सुचवली होती त्याचे टेंडर प्रोसेस झालेले आहे. आता ती कामे आपण सुरू करू शकतो असं अधिकाऱ्यांनी म्हटलं. त्याच्या कामाच्या उद्धाटनासाठी आम्ही तिथे पोहचलो. स्थानिक होते. मात्र तेव्हा १-२ जण आले आणि रस्त्याचे काम करू नका असं म्हटलं. काम नाही करायचे ते ठरवू शकत नाहीत. काम होणारच, कुणी विरोध केला तरी कामाला आम्ही सुरुवात केली. आम्ही विरोधकांकडे लक्ष दिले नाही. कोण काम थांबवतंय ते आम्ही बघू असा इशारा त्यांनी ठाकरे गटाला दिला. 

त्याचसोबत अजय चौधरी यांना त्याठिकाणी रस्ता होणार याची माहितीही नव्हती. मी २ दिवसाआधी फ्लेक्स लावले होते. त्यानंतर हा रस्ता मंजूर झाला हे त्यांना कळालं. त्या परिसरात ज्या इमारती आहेत. अनेक कामे मी माझ्या नगरसेवक निधीतून केलीत. केवळ इमारत दुरूस्ती कामात आमदार यायचे. मी स्थानिकांची कामे केली म्हणून लोक माझ्याबाजूने उतरतात असंही समाधान सरवणकर म्हणाले. दरम्यान, नागरिकांना माहिती कोण श्रेय घेतंय आणि कोण उद्धाटनाला आलंय. त्यांनीही भूमिपूजन करावं. नागरिकांची कामे होणं महत्त्वाचे आहे. त्यांना कामाची माहिती नव्हती. केवळ वाद घालण्यासाठी ते तिथे आले होते. काम होत असेल तर वाद घालायचं एवढेच काम त्यांच्याकडे आहे. लोक त्यांच्यासोबत नाहीत, मतदान होणार नाही हे कळाल्यामुळे वाद घालायचा प्रयत्न होतोय. खोके, ओके आणि बोके आम्हीही बोलू शकतो. कोविडमध्ये कुणी खोके घेतले. वरळीत कुणाचे खोके आले. टेंडर एकालाच कसे मिळाले सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाचं मान सन्मान ठेवायला हवा. उद्या जर आम्ही बोलायला लागलो तर त्यानंतर आमच्या नेत्यांवर बोलताय म्हणून पुढे येऊ नका. लोकांची कामं करा, वादात पडू नका असंही समाधान सरवणकरांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना