अपूर्ण नालेसफाईमुळे तुंबई होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:20 IST2025-05-20T16:20:25+5:302025-05-20T16:20:43+5:30
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९,६३,६९६.८१ मेट्रिक टन पैकी ५,३०,४७६.०७ मेट्रिक टन इतकी ५५ टक्के नालेसफाई झाली. अंधेरी (पूर्व) मरोळ परिसरात मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम कंत्राटदाराकडून धिम्या गतीने सुरू आहे.

अपूर्ण नालेसफाईमुळे तुंबई होण्याची शक्यता
मुंबई : मुंबईत नालेसफाईची कामे सुरू आहेत. नियोजनानुसार ३१ मेपर्यंत ८० टक्के नालेसफाई करायची आहे; मात्र १५ मेपर्यंत फक्त ५५ टक्केच नालेसफाई झाली आहे. यंदा मुंबईत लवकर पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या ३१ मेपर्यंत ४५ टक्के नालेसफाई करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. त्यामुळे अपूर्ण नालेसफाईमुळे यंदा मुंबईची तुंबई होणार का, असा सवाल मुंबईकरांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९,६३,६९६.८१ मेट्रिक टन पैकी ५,३०,४७६.०७ मेट्रिक टन इतकी ५५ टक्के नालेसफाई झाली. अंधेरी (पूर्व) मरोळ परिसरात मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम कंत्राटदाराकडून धिम्या गतीने सुरू आहे. दरवर्षी मिठी नदीच्या सफाईचे काम हे कागदावरच पूर्ण होते, मिठी नदी साफ न झाल्यामुळे अंधेरी परिसरात पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेडलाईन पूर्वी मिठी नदीतील गाळ काढला गेला नाही तर कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे अंधेरी विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी दिला.
अंधेरी सब वे, मालाड सब वे आणि दहिसर सब वे, ओबेरॉय मॉल जंक्शन या विविध ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. त्यामुळे येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिका प्रशासनाने याठिकाणी आवश्यक क्षमतेचे उदंचन पंप उपलब्ध करून द्यावेत. तसेच ज्याठिकाणी जास्त पाऊस पडून पाणी तुंबले आहे त्याची माहिती पालिका प्रशासनाने प्रसिद्धी माध्यम,सोशल मीडिया, ॲपद्वारे मुंबईकरांना द्यावी.
सुनील कुमरे, अध्यक्ष, नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट.
कार्यालयात कचरा टाकू...
नालेसफाई केवळ मोठ्या नाल्यांमध्येच होत असून लहान नाले दुर्लक्षित राहतात. मनपाच्या एल वॉर्डकडून नालेसफाई होत नसल्याने साकीनाक्यात एक नाला कचऱ्यानं तुडुंब भरलेल्या नाल्यात मनसैनिक चक्क व्हॉलीबॉल खेळले.
जर मनपा अधिकाऱ्यांनी या नाल्याची सफाई केली नाही तर येथील सगळा कचरा एल वॉर्ड विभाग कार्यालयात नेऊन टाकण्यात येईल, असा इशारा चांदिवलीचे मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिला.