Join us  

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड 'या' व्यक्तींच्या संपर्कात?; कार्यालयातील प्रशासकीय कामकाजही सुरळीत

By मुकेश चव्हाण | Published: February 17, 2021 2:23 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती.

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे,  यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. 

पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. संजय राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड नेमके आहेत कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच- सहा दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. मात्र, आज मंत्रालयात त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू आहे. त्यामुळे संजय राठोड हे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला देखील संजय राठोड अनुपस्थित होते. आज कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीला तरी संजय राठोड उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

तत्पूर्वी,  संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल- गृहमंत्री

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आता पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. मात्र संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत.

मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी

आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :संजय राठोडपूजा चव्हाणमंत्रालयउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार