Join us  

Pooja Chavan Case: पूजा चव्हाण प्रकरणी गूढ अखेर उघडलं; शवविच्छेदन अहवालातून मिळाली महत्त्वाची माहिती

By मुकेश चव्हाण | Published: March 02, 2021 7:53 AM

Pooja Chavan Case: Wanwadi police has received a detailed report of Pooja Chavan's autopsy: पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल (Pooja Chavan Post Mortem Report ) वानवडी पोलिसांना प्राप्त झाल्याचं कळत आहे.

मुंबई: बीड जिल्ह्यातील  टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या या आत्महत्येनंतर राज्यात राजकारण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. तसेच या प्रकरणाबाबत दिवसेंदिवस अनेक नवा खुलासा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र याचदरम्यान आता पूजा चव्हाण प्रकरणातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

एका मराठी वृत्तावाहिनीच्या वृत्तानूसार, पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल (Pooja Chavan Post Mortem Report ) वानवडी पोलिसांना प्राप्त झाल्याचं कळत आहे. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच पूजा चव्हाणचा मृत्यु झाल्याचं स्पष्ट होत आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या किमान मुळ कारणापर्यंत पोहोचू शकणारा सविस्तर शवविच्छेदन अहवालही वानवडी पोलिसांना प्राप्त झाला आहे. 

पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्या मणक्‍याला आणि डोक्‍याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यु झाल्याचे कारण समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर मात्र पोलिसांकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

तत्पूर्वी, पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगतानाच या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. 

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड, अरुण राठोड आणि  विलास चव्हाण यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी पूजाची आजी शांताबाई राठोड, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई उपोषणाला बसल्या आहेत. मात्र, शांताबाई राठोड यांचा आमच्या कुटुंबाशी कोणतेही रक्ताचे नाते नाही, असे पूजाच्या आई-वडिलांनी आपल्याला सांगितले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

विरोधकांनी माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली- संजय राठोड

पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षाने अत्यंत घाणेरडे राजकारण करून माझी तसेच माझ्या समाजाची बदनामी केली. मला राजकीय जीवनातून उठविण्याचा प्रयत्न केला. पूजा मृत्यू प्रकरणाची चौकशी नि:पक्षपणे व्हावी, यासाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सत्य काय ते बाहेर यावे. राठोड राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, ही विरोधकांची भूमिका घटनाविरोधी होती. आधी चौकशी होऊ द्या, अशी भूमिका मी घेतलेली होती, पण चौकशी नि:पक्ष व्हावी, यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपविला आहे. 

प्रकरण दाबण्यासाठी  दिलेत ५ कोटी रुपये

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार नाही, तोवर लढा सुरू ठेवला जाणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर लगेच गुन्हा दाखल केला जातो; मात्र, मंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिली आहे. तसेच हे  प्रकरण दाबण्यासाठी  पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले, असा दावा त्यांनी केला. 

शांताबाई राठोड यांनी सोमवारी (दि. १) पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राठोड म्हणाल्या, पूजाचे आणि माझे चांगले नाते होते. तिला न्याय मिळणार नाही, तोवर लढा सुरू राहील. पाच कोटी रुपये दिल्याचा पुरावा योग्यवेळी नावासह देणार आहे. परळीतील सीसीटीव्ही मिळावे यासाठी अर्ज दिला आहे. अरुण राठोड हा माझ्या चुलतभावाचा मुलगा आहे. पूजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :पूजा चव्हाणसंजय राठोडपोलिसपुणेमहाराष्ट्रडॉक्टर