Sushant Singh Rajput Suicide: रहस्ये दडपण्यासाठीच गदारोळ माजवला जातोय, कोणी तरी पटकथा लिहितंय; संजय राऊतांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:54 IST2020-08-10T03:08:25+5:302020-08-10T06:54:38+5:30
मुंबई पोलिसांनी तपास करावा, तो पूर्ण झाल्यावर त्यावर कुणाला काही बोलायचे असेल ते बोलावे. पण तपास होण्याआधी ज्या घडामोडी सुरू आहेत, त्या आश्चर्यकारक आहेत, असे राऊत म्हणाले.

Sushant Singh Rajput Suicide: रहस्ये दडपण्यासाठीच गदारोळ माजवला जातोय, कोणी तरी पटकथा लिहितंय; संजय राऊतांचा आरोप
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून घृणास्पद राजकारण केले जात आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात आपली रहस्ये उघड होतील, या भीतीपोटी गदारोळ माजविला जात आहे. सर्व घटनाक्रम पाहता कोणीतरी पटकथा लिहीत आहे आणि त्यानुसार या प्रकरणात घटना घडविल्या जात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केला.
मुंबई पोलिसांनी तपास करावा, तो पूर्ण झाल्यावर त्यावर कुणाला काही बोलायचे असेल ते बोलावे. पण तपास होण्याआधी ज्या घडामोडी सुरू आहेत, त्या आश्चर्यकारक आहेत. महाराष्ट्रातील घटनेवर ४० दिवसांनी पाटणामध्ये गु्न्हा दाखल होतो, बिहारचे मुख्यमंत्री यावर विधान करतात. बिहारच्या विधानसभेत प्रस्ताव मंजूर केला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अथवा पोलीसप्रमुखांना विश्वासात न घेता तपास सीबीआयकडे सोपवणार असल्याचे केंद्र न्यायालयात सांगते. सारा प्रकार संशयास्पद आहे. बिहारमधील काही राजकीय नेते, महाराष्ट्राच्या नेत्यांची यात हातमिळवणी झाल्यासारखे वाटते. सीबीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. मात्र कितीही चक्रव्यूह रचा, आम्ही भेदून बाहेर येऊ, असे त्यांनी सांगितले.
सुशांतच्या मृत्यूच्या ५० दिवसांनंतर अचानक राजकारण सुरू झाले. त्यामागे कोण आहे? सुशांत किती वेळा वडिलांना भेटायला बिहारला गेला होता? मला त्याच्या वडिलांविषयी आदर, सद्भावना आहेत. मात्र त्यांचे संबंध ठीक नसल्याची माझ्याकडे माहिती आहे. काही गोष्टी तपासात समोर येतील, असे राऊत म्हणाले.