Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणा दाम्पत्यावरील गुन्हा नोंदविण्यामागे राजकारण; वकिलांची न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 06:58 IST

सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाच्या आरोपांतर्गत भरविलेल्या सर्व खटल्यांना स्थगिती दिली आहे.

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर राजकीय उलथापालथीमुळे राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला, असा दावा राणा दाम्पत्याच्या वकिलाने विशेष न्यायालयात केला. मुंबई पोलिसांनी नवनीत राणा व रवी राणा यांचा जामीन रद्द करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. गुरुवारी सरकारी वकील व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. विशेष न्यायालयाचे न्या. आर. एन. रोकडे यांनी मुंबई पोलिसांच्या अर्जावरील निकाल २२ ऑगस्टपर्यंत राखून ठेवला.

सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाच्या आरोपांतर्गत भरविलेल्या सर्व खटल्यांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे ते (मुंबई पोलीस) आदेशावर पुनर्विचार करण्यासाठी अर्ज करू शकत नाही. आता राणा दाम्पत्यावर केवळ १५३ (अ) (दोन गटांत वैर निर्माण करणे)  या कलमाअंतर्गतच कारवाई केली जाऊ शकते, असा युक्तिवाद राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केल्यानंतर २३ एप्रिल रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली.  ५ मे रोजी न्यायालयाने त्यांची सशर्त जामिनावर सुटका केली. प्रसारमाध्यमांसमोर कोणतेही विधान न करण्याच्या अटीचाही समावेश होता. मात्र, त्यांनी या अटीचा भंग केल्याने त्यांचा जामीन रद्द करावा, असे पोलिसांनी अर्जात म्हटले आहे.

राणा दाम्पत्याने कारागृहातून बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणी कोणतेही विधान केलेले नाही. केवळ एकदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर मुलाखत दिलेली नाही. राणा दाम्पत्याने प्रसारमाध्यमांना दिलेली मुलाखत न्यायालयासमोर  सादर करण्यात आलेली नाही. माध्यमे लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. न्यायालयाचा अवमान होईल, असे कृत्य केलेले नाही, असा युक्तिवाद मर्चंट यांनी न्यायालयात केला. 

टॅग्स :नवनीत कौर राणारवी राणाउद्धव ठाकरेशिवसेनापोलिस