राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 06:45 AM2019-11-07T06:45:12+5:302019-11-07T06:45:48+5:30

शिवसेनेशिवाय सरकार नाही, भाजपची भूमिका

Political events in the state towards presidential rule in maharashtra | राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने

राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने

googlenewsNext

मुंबई : शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करायची नाही, अशी भाजपने घेतलेली भूमिका, काँग्रेस आणि राष्टÑवादीकडून अद्यापही शिवसेनेला न मिळालेला हिरवा कंदील यामुळे सत्तासंघर्षाचा पेच अत्यंत बिकट झाला असून राज्याची पाऊले आता राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पडत असल्याची अवस्था निर्माण झाली आहे. ‘काय होणार?’ या प्रचंड उत्सुकतेची जागा आता ‘काहीही होऊ शकतं’ या अवस्थेने घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची मंगळवारी रात्री भेट घेतल्यानंतर भाजपच्या रणनीतीची दिशा निश्चित झाली. ‘शिवसेना सोबत येणार असेल तरच सत्ता स्थापन करा, सत्तेसाठी राष्ट्रवादीचा वा कोणत्याही पक्षातील बंडखोरांचा पाठिंबा मिळवून जोडतोड करू नका, अनैसर्गिक युती नको, राष्ट्रपती राजवटीची वेळ आली तर त्यासाठी तयार राहा’, असे भागवत यांनी स्पष्टपणे बजावल्याची माहिती आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की राज्यात महायुतीचेच सरकार येईल, कोणी काहीही विचार केला तरी तसेच होणार आहे. हे सांगतानाच, महायुतीशिवाय अन्य कुठल्याही पर्यायावर भाजप विचार करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज झाली. त्यावेळीही शिवसेना सोबत येणार नसेल तर सत्ता स्थापन करायची नाही, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र भाजप-शिवसेनेने राज्यात लवकर सरकार स्थापन करावे, आम्ही जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून काम करू, असे विधान दुपारी पत्रपरिषदेत केले. मात्र, त्याचवेळी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसचे बहुतेक आमदार उत्सुक असल्याचे समोर आले. प्रसंगी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा द्या; पण भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येण्यापासून रोखा, असा सूर काँग्रेसच्या आमदारांमध्ये असल्याचे दिसत आहे. अशावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना मुख्यमंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न करू शकते. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे बुधवारी रात्री मुंबईत येऊन आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल, असे म्हटले जाते. काँग्रेस शिवसेनेला कोणत्याही प्रकारे सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आगामी काळात काही राज्यांमध्ये असलेली विधानसभा निवडणूक, राज्यातील दलित-मुस्लिम व्होटबँकेवर होणारा परिणाम आणि राममंदिरासह विविध मुद्यांवर शिवसेनेची अमान्य असलेली भूमिका या पार्श्वभूमीवर काँग्रेस शिवसेनेला सरकारसाठी पाठिंबा देण्याची शक्यता नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे सरकार आले तर शरद पवार यांचे महत्त्व अधिक वाढेल आणि ते काँग्रेसच्या सोईचे नसेल, असा मोठा मतप्रवाह दिल्लीत काँग्रेसमध्ये आहे.

शिवसेना आमदारांची आज बैठक
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत बोलविली आहे. सत्तास्थापनेबाबत ठाकरे या बैठकीत कोणती भूमिका मांडतात या बाबत उत्सुकता असेल. आमदारांची मतेही ते जाणून घेतील, अशी शक्यता आहे. निकालनंतर झालेल्या आमदारांच्या पहिल्या बैठकीत उद्धव यांनी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत स्वत:चा मुख्यमंत्री बसवेल, असे आमदारांना आश्वस्त केले होते.


शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम
शिवसेनेने युतीमध्ये मुख्यमंत्रिपद आम्हालाच मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका कायम ठेवली. शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याशिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत, असे पक्षाचे नेते खा.संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.

भाजपला मुख्यमंत्रिपद कोणत्याही परिस्थितीत हवे आहे. त्यामुळे तिढा कायम आहे. मुख्यमंत्री पदावरून कितीही ताणले गेले असले तरी भाजप-शिवसेनेने सत्तावाटपाची चर्चा एका मध्यस्थामार्फत सुरूच ठेवली.


राष्ट्रपती राजवट केव्हा, कशी?
राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ अन्वये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद आहे. राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालत नसल्याची किंवा तसा चालविणे अशक्य असल्याची राष्ट्रपतींची खात्री होणे हा यासाठी मुख्य निकष आहे. नवी विधानसभा अस्तित्वात आल्यावर ज्याला बहुमताचा पाठिंबा आहे असे लोकनियुक्त सरकार अधिकारावर आणणे हे राज्यपालांची संवैधानिक जबाबदारी आहे. कोणत्याही कारणाने नवे सरकार स्थापन होऊ न शकणे हे राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालविता न येण्याचेच द्योतक ठरते.
अशा वेळी राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. मात्र कोणत्याही परिस्थितीत नवे सरकार स्थापन होईपर्यंत आधीच्या विधानसभेतील बहुमताच्या आधारे सत्तेवर आलेले सरकार मुदत संपल्यानंतर सत्तेवर राहू शकत नाही.

Web Title: Political events in the state towards presidential rule in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.