Join us  

अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 6:39 PM

महायुतीतील विविध दिग्गज नेत्यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू असताना यामिनी जाधव यांना तिकीट मिळवण्यात यश आलं आहे.

Shivsena Yamini Jadhav ( Marathi News ) : महायुतीने आज धक्कातंत्राचा अवलंब करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. महाविकास आघाडीकडून यापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत रंगणार आहे. मात्र महायुतीतील विविध दिग्गज नेत्यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू असताना तिकीट मिळवणाऱ्या यामिनी जाधव नक्की कोण आहेत, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या वारीस पठाण यांचा पराभव करत निवडून आलेल्या यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव हे दोघेही शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. उच्चशिक्षित असलेल्या यामिनी जाधव या २०१२ मध्ये सर्वप्रथम नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या विविध समित्यांवरही काम केलं. शिवसेनेने २०१९ मध्ये त्यांच्यावर विश्वास दाखवत जाधव यांना भायखळ्यातून तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत वारिस पठाण यांना पराभूत करून यामिनी जाधव विजयी झाल्या.  

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदेंना साथ

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत वेगळी भूमिका घेतली. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २० ते २२ आमदार होते. मात्र हळूहळू ही संख्या वाढत गेली. मात्र उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनीही शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. परंतु आपल्या बंडाचं समर्थन करत यामिनी जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते. "आपल्या पडत्या काळात पक्षनेतृत्वाने आपली साधी विचारपूस केली नाही. कॅन्सर झाल्याचं कळवूनही कुणी विचारपूस केली नाही. त्यामुळे मला प्रचंड वेदना झाल्या होत्या," असं जाधव यांनी म्हटलं होतं.

यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची झाली होती मागणी

आयकर विभागाने २०२१ साली यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. आयकर विभागाने म्हटलं होतं की, २०१९ मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती संबंधित चुकीची माहिती जोडली होती. त्यासाठी यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. या प्रकरणी आयकर विभागाने यामिनी जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी केली असता ही बाब समोर आली. तपासात कोलकाता येथील शेल कंपन्याद्वारे काही आर्थिक व्यवहार झाल्याचं उघडकीस झालं होतं. मात्र नंतर त्यांची आमदारकी कायम ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली असली तरी त्यांच्यासाठी ही लढत सोपी असणार नाही. कारण त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनुभवी खासदार अरविंद सावंत यांचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना यश येणार की पराभवाचा सामना करावा लागणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :यामिनी जाधवमुंबई दक्षिणअरविंद सावंतमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४