Join us  

Home Minister : पोलीस भरती अन् शक्ती कायदा हे प्रमुख लक्ष्य, लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 2:46 PM

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपदाची अधिकृत सुत्रे स्वीकारली. त्यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपदाची अधिकृत सुत्रे स्वीकारली. त्यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई -  राष्ट्रवादी पक्षाने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माझ्यावर विश्वासाने जबाबदारी टाकली ती मला पार पाडायची आहे. सध्या हे आव्हानात्मक काम आहे, कारण कोरोनामुळे पोलीस रस्त्यावर आहेत. याच महिन्यात गुढी पाडवा, राम नवमी, आंबेडकर जयंती आहे. तर, रमजान महिन्यालाही सुरुवात होत आहे. गृह विभागाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळेच, सामान्य माणसांना केंद्रबिंदू ठेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहिल, असे नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपदाची अधिकृत सुत्रे स्वीकारली. त्यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा काळ आव्हानात्मक असल्याचंही ते म्हणाले. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले, असंही राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. (dilip walse patil meets sharad pawar, will take home ministry charge today)

गरजेनुसार आजी-माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिल. पोलीस भरती, शक्ती कायदा आणि पोलिसांची 1 लाख घरे बांधणे ही कामं प्रामुख्याने लक्ष्य आहेत, असेही गृहमंत्र्यांनी सांगितलं. हायकोर्टाच्या निकालानंतर सर्वच तपास यंत्रणांना गृहविभागाकडून सहकार्य राहिल. तर, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत आहोत, असेही त्यांनी सांगितलं. अद्याप मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही, पण लवकरच त्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, आता दिलीप वळसे पाटील हे राज्याचे नवे गृहमंत्री असतील. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले वळसे पाटील यांच्याकडे आतापर्यंत उत्पादन शुल्क आणि कामगार अशी दोन खाती होती. 

उत्पादनक शुल्क खात्याचा भार अजित पवारांकडेआता उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कामगार खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सायंकाळी पाठविला असून तो स्वीकारावा, अशी विनंती त्यांना केली होती. याच पत्रात त्यांनी, वळसे पाटील यांच्याकडील सध्याची खाती अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्याची विनंती केली होती. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली. 

टॅग्स :दिलीप वळसे पाटीलअनिल देशमुखकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामुख्यमंत्रीपोलिस