Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील मोठ्या मशीदींबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली; क्विक रिस्पॉन्स टीमचे जवानही तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:23 IST

ईद आणि उद्या दिलेला अल्टीमेंटम या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुंबई- ३ मे रोजी ईद आहे. त्या सणाला गालबोट लावायचं नाही. पण ४ तारखेपासून ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदींवर भोंगे असतील, त्या त्या ठिकाणी लाऊड स्पीकरवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. यांना विनंती करून समजत नसेल, तर मग आमच्यासमोर पर्याय नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे.

राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि शांतता प्रस्थापित राहावी, यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबईतल्या मोठ्या मशिदींबाहेर सुरक्षा वाढवली आहे. ईद आणि उद्या दिलेला अल्टीमेंटम या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलिसांसोबत QRT(क्विक रिस्पॉन्स टीम)चे जवान सुद्धा मशिदीबाहेर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. 

कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका, असं आवाहन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी केलं आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की,"कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज आहे. सीआरपीएफच्या ८७ कंपनी आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर आहेत.

दरम्यान, इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे गृह विभागाने सांगितले आहे. तसेच, महाराष्ट्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. 

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल-

१ मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५२ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेपोलिसमहाराष्ट्र सरकार