Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचं खास ट्विट; जुन्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 11:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन केलं आहे.

मुंबई- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे  (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना भवन चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

एकनाथ शिंदेंसह राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार?; आजच्या कार्यक्रमाकडे राज्याचं लागलं लक्ष

बाळासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त राजकारणातील विविध नेते त्यांना अभिवादन करत आहेत. याचदरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. बाळासाहेबांनी आपले जीवन लोकांच्या कल्याणासाठी वाहून घेतले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पा आणि चर्चा नेहमी माझ्या स्मरणात राहतील. त्यांना उत्तम ज्ञान आणि वक्तृत्वाची देणगी लाभली होती, असं नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्रतेने अभिवादन केले.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचं जाहीर केलं होतं. याच दिवसाचं औचित्य साधत आज विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरणही करण्यात येणार आहे. या तैलचित्राच्या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र निमंत्रण मिळाल्यानंतरही ठाकरे कुटुंब कार्यक्रमाला येणार का याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरेंनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेनरेंद्र मोदीशिवसेनाभाजपा