पीएम मोदी, सीएम उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे उद्या एकाच मंचावर? 'त्या' सोहळ्याची एकच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 15:42 IST2022-04-23T15:41:37+5:302022-04-23T15:42:26+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत; मोदी आणि ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता

pm narendra modi cm uddhav thackeray mns chief thackeray might share stage at Lata Mangeshkar award | पीएम मोदी, सीएम उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे उद्या एकाच मंचावर? 'त्या' सोहळ्याची एकच चर्चा

पीएम मोदी, सीएम उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे उद्या एकाच मंचावर? 'त्या' सोहळ्याची एकच चर्चा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आपण सोडला नसल्याचं शिवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मशिदींच्या भोंग्यांवरून आक्रमक झालेले राज ठाकरे भाजपचा भोंगा असल्याची टीका शिवसेनेकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर असतील.

मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं वितरण उद्या होणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये सोहळा संपन्न होईल. लता मंगेशकर यांच्या नावानं प्रथमच पुरस्कार दिला जाणार आहे. हा पहिलावहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी उद्या मुंबईत येणार आहेत.

गेल्या ३२ वर्षांपासून मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान केला जातो. यंदाचा सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. उद्या संध्याकाळी सोहळा पार पडेल. लता मंगेशकरांच्या नावे दिला जाणारा पहिला पुरस्कार मोदींना जाहीर झाला आहे. तो स्वीकारण्यासाठी मोदी उद्या मुंबईत येत आहेत. 

उद्याच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रित करण्यात आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनादेखील आमंत्रण देण्यात आलं आहे. हे दोन्ही उद्याच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसतील. 

Web Title: pm narendra modi cm uddhav thackeray mns chief thackeray might share stage at Lata Mangeshkar award