प्लॅस्टिकबंदीमुळे किराणा महागणार; एक ते चार रुपये जादा मोजावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 06:07 AM2018-07-06T06:07:50+5:302018-07-06T06:07:50+5:30

किराणा मालाच्या पॅकिंगला ५० मायक्रॉनहून अधिक जाडीच्या पिशव्या वापरण्याची परवानगी मिळाल्यावर त्या परत घेण्याऐवजी त्यामुळे खर्च वाढल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी मालात एक ते चार रूपयांची दरवाढ सुरू केली आहे.

 Plenty of taxes will be increased; One to four rupees will have to pay the excess | प्लॅस्टिकबंदीमुळे किराणा महागणार; एक ते चार रुपये जादा मोजावे लागणार

प्लॅस्टिकबंदीमुळे किराणा महागणार; एक ते चार रुपये जादा मोजावे लागणार

Next

- चेतन ननावरे

मुंबई : किराणा मालाच्या पॅकिंगला ५० मायक्रॉनहून अधिक जाडीच्या पिशव्या वापरण्याची परवानगी मिळाल्यावर त्या परत घेण्याऐवजी त्यामुळे खर्च वाढल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी मालात एक ते चार रूपयांची दरवाढ सुरू केली आहे. त्यामुळे पिशव्या जपून त्या दुकानदारांना परत देत त्याचे पैसे परत घेण्याची जबाबदारी ग्राहकावर आली आहे.
या पिशव्यांच्या खर्चापोटी एक ते चार रुपयांची दरवाढ करावी लागत असल्याची माहिती बॉम्बे ग्रेन डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमणिक छेडा यांनी दिली. ही संघटना मुंबईची असली तरी संपूर्ण राज्यात याचप्रकारे ग्राहकांना भुर्दंड द्यावा लागेल. ‘बाय बॅक पॉलिसीत’ दुकानदारांनी पिशव्या पुन्हा स्वीकारून, पैसे परत करणे अपेक्षित आहे. त्यासाठी दुकानदार तयार असले, तरी पिशव्यांची किंमत आधीच किराणा मालाच्या दरवाढीतून वसूल केली जाणार आहे.
प्लॅस्टिकच्या पॅकिंगसाठी दुकानदार स्वतंत्र दर आकारणार नाहीत. किराण्यातील वस्तुंच्या किंमतींप्रमाणे दरवाढ होईल. त्यात साखर, गहू, तांदूळ या जिन्नसांचा समावेश आहे. सरकारच्या नियमांनुसार वापरायच्या पिशव्यांसाठी एक ते चार रुपये जास्त खर्च येतो. दरमहा ही रक्कम तीन ते पाच हजार रुपये होते. म्हणूनच किराणा मालाची किंमत वाढवून पिशव्यांच्या किंमतीचा भार हलका करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

बंदी मागे घेण्याची उत्पादकांची मागणी
शासनाने प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी काही अटींसह मागे घ्यावी, अशी मागणी प्लॅस्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडियाने पर्यावरण विभागाकडे केली आहे. संघटनेचे सरचिटणीस नीमित पुनमिया म्हणाले, २० ग्रॅम वजनाच्या आणि ५० मायक्रॉनहून अधिक जाडीच्या पिशव्यांना सूट देण्याचे निवेदन पर्यावरण विभागाला दिले आहे.
या प्रस्तावात १५ ते २० रुपये दराने संबंधित पिशव्या पुनर्प्रक्रियेसाठी घेण्याची तयारी उत्पादक संघटनेने दाखवली आहे. कचरावेचकांना प्रत्येक पिशवीमागे ४० पैसे मिळणार आहेत. त्यामुळे दुधाच्या पिशव्या आणि पेट बॉटल्सप्रमाणे भंगारवाले आणि कचरावेचक या पिशव्या उत्पादकांपर्यंत पोचवतील, असा त्यांचा दावा आहे.

पॅकिंगसाठी किती खर्च?
पाव आणि व अर्धा किलो सामानाची पिशवी : १ रुपया
एक किलो सामानासाठी लागणारी पिशवी : २ रुपये
दोन ते पाच किलो सामानासाठी लागणारी पिशवी : ३ रुपये
पाच ते सहा किलो सामानासाठी लागणारी पिशवी : ४ रुपये

...तरच पैसे परत!
ग्राहकांनी अर्धा किलो वस्तू घेतल्यास दरवाढ केली जाणार नाही. मात्र एक किलोहून अधिक सामान खरेदी करताना दरवाढीचा सामना करावा लागेल. पिशवी परत आणून दिल्यानंतरच ग्राहकांना पिशवीच्या किंमतीइतके पैसे परत केले जातील, असेही संघटनेने स्पष्ट केले.

२० मायक्रॉनच्या पिशव्यांना परवानगी द्या!
किराणा दुकानदारांनी २० मायक्रॉन जाडीच्या पिशव्यांना परवानगी मिळावी, अशी विनंती सरकारला केली आहे.त्यामुळे दरवाढीचा बोजा पडणार नाही, असा दावा त्यांनी केला. या पिशव्यांवर पुनर्प्रक्रिया करणे शक्य असून बाय बॅक पॉलिसीअंतर्गत त्या पुन्हा प्रक्रियेत आणण्याची ग्वाही दुकानदार संघटनेने सरकारला दिली आहे.

Web Title:  Plenty of taxes will be increased; One to four rupees will have to pay the excess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.