Join us

शिवसेना ठाकरे पक्षाचा प्लॅन B तयार; अंधेरी पोटनिवडणुकीसाठी देणार नवा उमेदवार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 08:50 IST

ऋतुजा लटके या बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे ठाकरे गटाने सावध पावलं उचलत प्लॅन बी तयार ठेवला आहे.

मुंबई - शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील प्रशासकीय सेवेचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नाही. त्यामुळे ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांकडून दबावाचं राजकारण होत असल्याचं आरोप करत ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

त्यात ऋतुजा लटके या बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे ठाकरे गटाने सावध पावलं उचलत प्लॅन बी तयार ठेवला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून दुसऱ्या शिवसैनिकाला तिकीट देण्याची तयारी सुरू झाली आहे. याबाबत विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, मुंबई महापालिकेकडून अद्याप ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर झाला नाही. कदाचित सत्ताधाऱ्यांचा आयुक्तांवर दबाव असेल. लोकशाहीत नियमानुसार काम करणं गरजेचे आहे. राजीनामा मंजूर न झाल्यास प्लॅन बी तयार आहे असं त्यांनी म्हटलं. 

ऋतुजा लटकेंचा राजीनामा लटकला तर प्रमोद सावंत, विश्वनाथ महाडेश्वर आणि कमलेश राय यांना तयारीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. १४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. हायकोर्टात ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या निर्णयात लटकेंच्या राजीनामाच्या बाजूने निर्णय न आल्यास प्लॅन बीनुसार ठाकरे गटाने याठिकाणी ३ जणांपैकी एकाला उमेदवारीची संधी देण्याची तयारी केली आहे. तर या जागेवर भाजपाच्या मुरजी पटेल यांचेही नाव भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीकडून चर्चेत आहे. परंतु अद्याप उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नाही. 

लढेन तर ‘मशाल’वरचमाझे पती दिवंगत आमदार रमेश लटके हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ होते. आमच्या कुटुंबाची निष्ठा ठाकरेंवरच आहे. त्यामुळे निवडणूक लढवेन तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावरच. - ऋतुजा लटके

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे