शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 06:39 IST2025-07-22T06:36:30+5:302025-07-22T06:39:49+5:30
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र सुरूच असून, पश्चिम उपनगरात वृद्धेसह एका पायलटला १० कोटींना गंडविल्याचे समोर आले आहे.

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
मुंबई : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र सुरूच असून, पश्चिम उपनगरात वृद्धेसह एका पायलटला १० कोटींना गंडविल्याचे समोर आले आहे. नामांकित कंपनीच्या आड फसवणूक केल्याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
वांद्रे येथे पतीसोबत राहणाऱ्या वृद्धेला गेल्या महिन्यात अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲपद्वारे शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत विचारणा केली. वृद्धेने ग्रीन सिग्नल देताच आरोपीने एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले. त्यातील नफ्याबाबतचे अनुभव वाचून महिलेचा विश्वास बसला. त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. अवघ्या महिनाभरात या वृद्धेने विविध बँक खात्यांवर ७.८ कोटी रुपये भरले.
गुंतवणुकीपूर्वी वृद्धेने संबंधित कंपनीच्या नावे तयार केलेले ॲप डाउनलोड केले होते. त्यावर तिला गुंतवलेली रक्कम आणि त्यावरील नफा दिसत होता. काही दिवसाने बाजारातील मंदीने त्यांना तोटा झाल्याचे दिसले. त्यांनी साडेसहा कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न करता आणखीन पैसे भरण्यास सांगितले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
१५ कोटींचा नफा
अंधेरीत नामांकित विमान कंपनीतील ५६ वर्षीय पायलटला सव्वातीन कोटींचा गंडा घालण्यात आला. भामट्यांनी जून आणि जुलै महिन्यात सव्वातीन कोटींची गुंतवणूक करून घेतली. गुंतवणुकीवर १५ कोटी रुपये नफा झाल्याचे ॲपवर दिसत होते. ही रक्कम काढून घेताना आणखीन पैसे भरण्यास सांगताच त्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली.